ऑनलाइन लोकमतश्रीरामपूर(अहमदनगर), दि. 13 - राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या श्रीरामपूर पोलिसांच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या नोटांमध्ये चलनातून रद्द झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालय परिसरात ही रोकड पकडण्यात आली. कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्याचे संचालक संजय दौलतराव होन असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजकीय नेत्याचे नाव आहे. चलनातून रद्द झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटा असलेली रोकड घेऊन जाणारी जीप श्रीरामपुरातून जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना मिळाली होती. त्यांनी ही महिती श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना कळवून कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकात पोलीस पथकासह सापळा लावून जीपची वाट पाहत होते. संशयित जीप दिसताच पोलीस निरीक्षक पवार यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच चालकाने जीप भरधाव वेगात पळविण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सुमारे तीन-चार किलोमीटर जीपचा पाठलाग करून जीपला बोरावके कॉलेज परिसरात तिला अडविले. पोलिसांनी जीपची झाडाझडती घेतली असती त्यात चलनातून रद्द झालेल्या एक हजार रुपयांच्या अडीच हजार नोटा मिळून आल्या. पोलिसांनी जीपसह नोटा तसेच या नोटा बाळगणाऱ्या होन यांना ताब्यात घेतले आहे. संजय होन हे कोपरगाव येथीला संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. पोलीस ठाण्यात पंचनामा करून केलेल्या कारवाईची माहिती पोलिसांनी राज्य निवडणूक आयोग व आयकर विभागाला कळविली आहे.
साखर कारखान्याच्या संचालकांकडून २५ लाखांची रोकड जप्त
By admin | Updated: November 13, 2016 22:28 IST