अहमदनगर : गणेश मूर्तींसाठी नगरची बाजारपेठ संपूर्ण राज्यासह देशात प्रसिध्द आहे़ गणेशोत्सव काळात या मूर्तीविक्रीतून सुमारे वीस कोटी रुपयांची उलाढाल होते़ तर तीन हजार कारागीरांना रोजगार मिळतो़ नगरच्या मूर्तींना राज्यासह, गोवा, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुजरात आदी राज्यातून दरवर्षी मोठी मागणी असते़ शहरात गणेशमूर्ती बनविण्याचे १२० कारखाने असून, संपूर्ण जिल्ह्यात ११०० कारखाने आहेत़ शहरातील कारखान्यात वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम सुरू असते़ शहरातील कल्याण रोडवर सर्वाधिक कारखाने असून, ग्राहक थेट कारखान्यात येऊन मूर्ती खरेदी करत आहेत़ गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने राज्यातील इतर जिल्हे व परराज्यातील मागणीप्रमाणे मूर्ती पाठविण्याचे काम सुरू झाले आहे़ १ ते १४ फुटापर्यंत उंची असलेल्या विविध आकारातील आकर्षक मूर्ती खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत आहेत़ ५०० रुपयांपासून ते ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत मूर्तीचे दर आहेत़ घरगुती ग्राहकांचा छोट्या व आकर्षक मूर्ती खरेदीकडे जास्त कल आहेत तर सार्वजनिक मंडळांकडून मोठमोठ्या मूर्तींना मागणी आहे़ श्रीकृष्ण व राम अवतारातील, शेषनागाच्या पाठीवरील, कमळात बसलेली व मूषकावर स्वार झालेली अशा विविध अवतारातील मूर्ती या कारखान्यांमध्ये बनविण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यातही पारनेर वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत़ नगरनंतर श्रीरामपूर, शेवगाव व संगमनेरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे़ (प्रतिनिधी) नगरच्या बाप्पांचे परदेशातही आकर्षणनगरच्या गणेश मूर्तींचे परदेशातही मोठे आकर्षण आहे़ मुंबई येथील व्यापारी नगर येथून होलसेल दरात मूर्ती खरेदी करून नेपाळ, ब्राझिल, श्रीलंका व अमेरिका येथे पाठवितात़ भारतातील मूळ मात्र, व्यवसाय व नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झालेले अनेक कुटुंब दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात़ या भाविकांकडून नगरच्या गणेशमूर्तींना मोठी पसंती मिळते़ महागाईचा फटका गणेश मूर्तीसाठी नगरची बाजारपेठ प्रसिध्द आहे़ मात्र, वाढत्या महागाईमुळे कच्च्या मालांमध्ये मोठी भाववाढ झाली आहे़ रंग, जीप्सम यासह मूर्तीसाठी लागणाऱ्या विविध वस्तुंना दिवसेंदिवस जास्त पैसे लागतात़ वाहतुकीचा खर्च आणि कारागीरांची मजुरीही वाढली आहे़ त्यामुळे या वर्षी मूर्तींच्या दरात वाढ झाली आहे़ व्यवसायातील स्पर्धा आणि महागाईमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ - भरत निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, गणेश मूर्तीकार संघटना.
गणेश मूर्ती विक्रीतून २० कोटींची उलाढाल
By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST