अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज सरासरी शंभर जणांचा अहवाल पॉझिटिव्ह यायचा, त्याऐवजी आता ही संख्या दीडशेपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात शनिवारी १५७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहमदनगर शहर, नगर तालुका आणि संगमनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हयात शनिवारी झालेल्या जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत ५३, खासगी प्रयोगशाळेत ८१ आणि रॉपिड अन्टीजीन चाचणीत २३ अशा एकूण १५७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी १२९ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या १५७ मध्ये नगर शहर (४२),अकोले (०), जामखेड (१), कर्जत (२), कोपरगाव (९), नगर ग्रामीण (२६), नेवासा (२), पारनेर (८),पाथर्डी (०), राहाता (१६), राहुरी (५),संगमनेर (२९), शेवगाव (४), श्रीगोंदा (६), श्रीरामपूर (७) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान या चार दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही बाब दिलासादायक असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
------
चाचण्यांचा चार लाखांचा टप्पा पार
आतापर्यंत जिल्हयात चार लाख जणांची चाचणी पूर्ण झाली आहे. चाचणी झालेल्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण हे १८. ५७ टक्के असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. जिल्हाची एकूण लोकसंख्या ४५ लाख इतकी आहे. या एकूण लोकसंख्येपैकी चाचण्या झालेल्या लोकांचे प्रमाण हे फक्त ८.८ टक्के इतकेच होत असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------
सध्याची कोरोनाची स्थिती
एकूण बाधित रुग्ण- ७४३३५
बरे झालेले एकूण रुग्ण -७२३४३
उपचार घेणारे रुग्ण-८७१
एकूण मृत्यू-११२१
------------