अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात मुख्य आरोपी भानुदास कोतकर याच्यासह १५ जणांवर नाशिक येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश क्रमांक ३ एस.आर. कदम यांनी हे दोषारोपपत्र निश्चित केले आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी ५ जुलैपासून सुरू होणार आहे. नगरच्या जिल्हा न्यायालयाने दोषारोपपत्र सादर केल्यानंतर नाशिक जिल्हा न्यायालयात सदरचा खटला वर्ग झाला होता. या खून प्रकरणात तब्बल अडीच वर्षानंतर आरोपींवर दोषारोप निश्चित झाले आहेत.अशोक लांडेचा १९ मे २००८ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. अशोकचा मृत्यू अपघाताने झाल्याचा अहवाल कोतवाली पोलिसांनी न्यायालयाला सादर केला होता. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकर राऊत यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीवरून आरोपी भानुदास कोतकर, त्यांचे पुत्र संदीप, सचिन, अमोल, चालक अजय गायकवाड यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गृह विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुहास राणे यांच्याकडे आधी गुन्ह्णाचा तपास सोपविण्यात आला होता. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्याकडे तपास सोपविल्यानंतर तपासाला गती मिळाली होती.तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली १६ सप्टेंबर २०११ रोजी आरोपींना अटक करण्यात आली होती. अशोक लांडे यांच्या मृत्युचा शवविच्छेदन अहवाल बदलल्याचा आरोप असणारे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी राजेश ढवण आणि सदानंद उर्फ भाऊसाहेब उनवणे या दोघांनाही त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. १३ डिसेंबर २०११ रोजी नगरच्या जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.या गुन्ह्यातील आरोपींनी वेळोवेळी जामीन, दोषारोपपत्रातून वगळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केले होते. या कारणांमुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबली होती. दरम्यान सदरचा खटला चालविताना माध्यमांचा दबाव असल्याने तो खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्याची विनंती आरोपींतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी सदरचा खटला नाशिक जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. आमदार कर्डिलेही अडकलेकोतकर पिता-पुत्रांवर खुनाचा आरोप आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर मयत अशोकची पत्नी अर्चना व वडील भीमराज लांडे यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. हे सर्व आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. त्यामुळे दोषारोपपत्रातून वगळण्याबाबत कर्डिले यांनी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत. दरम्यान शनिवारी (दि.५)सरकारी वकील माने यांना साक्षीदारांची यादी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
कोतकरसह १५ जणांवर दोषारोप निश्चिती
By admin | Updated: July 4, 2014 01:21 IST