अहमदनगर : शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी १२ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात नमूद आहे, उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मुली शहरात येत असतात. आर्थिकदृष्ट्या मुलींना शहरात वास्तव्य करणे कठीण होते. मुलींसाठी शहरात वसतिगृह उभारण्याची विविध सामाजिक संघटनांची मागणी होती. मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत. परंतु, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलींना शिक्षण पूर्ण करता येत नाही. त्यामुळे शासनाने मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, नगर जिल्ह्यासाठी १३ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात वसतिगृहाची इमारत उभारण्यात येणार आहे. इमारत उभारण्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे जगताप म्हणाले.
..............