अहमदनगर : शैक्षणिक जीवनात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा यंदा कोरोनामुळे रद्द झाल्या असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काठावरचे विद्यार्थी खूश आहेत. कारण, ते उत्तीर्ण होतील. मात्र, हुशार विद्यार्थी आपल्यावर अन्याय होतो की काय या विवंचनेत आहेत. दुसरीकडे पुढील प्रवेश कसे होणार याबाबतही संभ्रमावस्था आहे.
कोरोनाची स्थिती असल्याने आधी दहावीच्या आणि आता बारावीच्याही परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापनातून लागणार आहे, तर पुढील प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु बारावीचे निकालाचे सूत्र काय असेल किंवा पुढील प्रवेशाबाबत कसे धोरण असेल याबाबत निर्णय शासनाने जाहीर केलेला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षेबाबत गोंधळ निर्माण झाल्याने पालकही चिंतेत दिसत आहेत. पुढे करिअरच्या दृष्टीने अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम असून, त्याला कोणत्या निकषावर प्रवेश घ्यायचा, आपल्या पाल्याचा अभ्यास होईल का, तो नोकरीला लागेल का? अशा एक ना अनेक चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागल्या आहेत. सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने सर्वसमावेशक तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
-------------
बारावीचे एकूण विद्यार्थी - ६४१२३
---------------
बारावीनंतरच्या संधी
बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांना अनेक विद्यार्थी पसंती देतात. याशिवाय औषधनिर्माण शास्त्र, फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कृषी, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट, आदी प्रवेश परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रता सिद्ध करता येते.
----------
दहावीप्रमाणेच बारावीसाठी अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील प्रवेशासाठी नेहमीप्रमाणे पात्रता परीक्षा होईल. मात्र, अंतिम निर्णय शासनाने अजून घेतलेला नाही. शासन, तसेच विद्यापीठाच्या सूचनेनुसार प्रवेश होतील.
- डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहमदनगर
-----------
बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाला अनेक विद्यार्थ्यांची पसंती असते. अभियांत्रिकीमध्ये आता संगणकीय कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. नेहमीप्रमाणे सीईटी परीक्षा होऊनच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश होतील, अशी शक्यता आहे.
-- डॉ. जयकुमार जयरामण, प्राचार्य, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय
------------------
विद्यार्थी, पालक काय म्हणतात
बारावी परीक्षेच्या दृष्टीने खूप अभ्यास केला होता. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड झाला. आता अंतर्गत मूल्यमापनातून किती गुण मिळतील याबाबत अंदाज नाही. परंतु कमी गुण मिळाले तर नुकसान होईल, असे वाटते.
- प्रदीप आगवन, विद्यार्थी
-------------
कोरोना काळ असतानाही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन का होईना अभ्यास केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाने परीक्षा रद्द केली हा निर्णय योग्य आहे, मात्र परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थी नाराज आहेत. पुढील प्रवेशासाठी आता सीईटी झाली तर त्यातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करता येईल.
- रामदास बर्वे, पालक