सोनई: जगप्रसिद्ध शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी तब्बल ९७ जणांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे यात १० महिलांनी अर्ज भरले आहेत़ देवस्थानच्या इतिहासातील विश्वस्तपदासाठी पहिल्यांदाच महिलांचे अर्ज आले आहेत़ अर्ज दाखल करण्याची शनिवारी (दि. १९) शेवटची मुदत होती. शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी गेल्या महिनाभर अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची इच्छुकांची धावपळ सुरु होती. शनिवारी अखेरच्या दिवशी ८७ पुरुष आणि १० महिलांनी अर्ज सादर केले. यात नंदा जगन्नाथ दरंदले, नूतन गोरख शेटे, वैशाली तुकाराम बानकर, अनिता चंद्रहास शेटे, जयश्री सतीश बानकर, साखरबाई संजय दरंदले, लीलाबाई दादा घायाळ, शालिनी राजेंद्र लांडे, द्वारका भुतकर, जयश्री सोमनाथ दरंदले यांचा समावेश आहे. अर्ज सादर केल्यानंतर आता इच्छुकांच्या मुलाखतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्जांची छाननी होऊन संबंधीतांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
‘शिंगणापूर’च्या विश्वस्तपदासाठी १० महिलांचे अर्ज दाखल
By admin | Updated: December 19, 2015 23:50 IST