शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सुंदर माझे ‘जाते’ ग फिरते बहुतेके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:27 IST

पूर्वी खेड्यामध्ये पहाटे घरातून मधूर आवाजात ओव्या ऐकू यायच्या. त्या ओव्या जात्यावरील असायच्या.

अहमदनगर : पूर्वी खेड्यामध्ये पहाटे घरातून मधूर आवाजात ओव्या ऐकू यायच्या. त्या ओव्या जात्यावरील असायच्या. आता ‘जाते’ म्हणजे काय हे चित्रात किंवा फोटोमध्ये दाखवून समजावून सांगावे लागते. अजून तरी गिरणीत ‘जाते’ दिसते पण काही दिवसांनी तेही नाहीसे होईल आणि ‘जाते’ ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात दिसेल. महिला वर्ग पहाटे उठून जात्यावर दळण दळीत असायच्या. ते दळण दळायला लागल्यावर त्यांना सहज ओव्या सुचायच्या. या खेड्यातील महिला कदाचित शिकलेल्या नसायच्या पण काव्याची एक प्रतिभा त्यांच्या मृदू अंत:करणात असायची. त्यांना सहज काव्य स्फुरत असे. पहाटे ते ऐकायलाही फार आनंद वाटायचा.खेड्यातील या अपरिहार्य असणा-या जात्याचा सर्व संतानी विचार केला आहे. त्याचे रूपक करून अध्यात्म सांगितले आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असणा-या संत श्री जनाबाई, श्री संत नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून तर होत्याच पण मुख्यत्वे त्या त्यांच्या शिष्या होत्या. त्यांचे सुमारे ३५० अभंग प्रसिध्द आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंगाने लिहिले होते. यावरून संत जनाबाईंचा अधिकार लक्षात यायला हरकत नाही. पांडुरंग त्यांना सर्व कामे करू लागत होता. पहाटे संत जनाबाई दळू लागल्या आणि त्यांना विठ्ठलाची आठवण आली. त्यांनी पांडुरंगाला साद घातली.‘सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके’ ‘ओव्या गाऊ कौतुक तु येरे बा विठ्ठला’‘जीवशीव दोनही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे’ ‘लावूनी पाची बोटे गे तु येरे बा विठ्ठला’ ‘सासु आणि सासरा दिर तो तिसरा’ ‘ओव्या गावू भर्तरा तु येरे बा विठ्ठला’‘बारा सोळा गडणी अवघ्या त्या कामिनी’ ‘ओव्या गावू बैसूनी तू येरे बा विठ्ठला’ ‘प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासूपुढे ठेविले तू येरे बा विठ्ठला’‘सत्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिल’ ‘पाप ते उतू गेले तू येरे बा विठ्ठला’‘जनी जाते गाईल कीर्त राहील’ ‘थोडासा लाभ होईल तू येरे बा विठ्ठला’श्री संत जनाबाईनी जात्याचे रूपक करून सुंदर अध्यात्म सांगितले आहे. जीव हा वरच्या पाळूचा खुंटा व शिव हा खालच्या पाळूचा मधला खुंटा जो स्थिर असतो. पंचमहाभूते हेच पाच बोटे व ममता, अहंकार, क्रोध (दीर) हे सासू सासरा आणि भ्रतार म्हणजे परमात्मा ( दुरूळ अंबुला केला गे माये, र्ब्हमादिका न पडेची ठाये-ज्ञा.म.) बारा सूर्याच्या कळा व सोळा चंद्राच्या कळा यांना सुद्धा स्त्रीया कल्पिलेले आहे. (बारा सोळा जणी हरीसी नेणती, म्हणोनी फिरती रात्रंदिवस’ नाथ. म. बारा सोळा दळियेल्या सत्रावी सहित, चंद्रसुर्य दळियेले तारांगणासहित. नाथ. म) प्रपंच दळून पीठ केले. म्हणजे जगत मिथ्यत्व निश्चय झाला व तोच बाध निश्चय करून श्रीगुरुपुढे सादर केले. सत्वाचे आधण ठेवले व पुण्य त्यात टाकले व पाप उतू गेले म्हणजे पुण्यपापरहित झाले. ‘तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप’ ‘लागो नेदी अंगा पाप पुण्य’ हे अवस्था खरी आहे. हे विठ्ठला ! जनी या प्रकारे जाते गाईल. त्यामुळे थोडासा लाभ होईल पण विठ्ठला तु इकडे ये व कृपा कर. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही.संत श्री जनाबाईची हि खरी अवस्था होती. जीवन जगत असतांना अनुकूल प्रतिकूल प्रसंग येताच असतात. पण या सर्व कर्मामध्ये भगवंताला विसरू नये. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ हे महत्वाचे आहे. ‘कामामध्ये काम’ काही म्हणा राम राम’ हे श्री तुकाराम महाराजांचे म्हणणे किती सार्थ आहे.एकदा संत श्री कबीर महाराज फिरत चालले असतांना त्यांनी असेच एके ठिकाणी जात्यावर दळण दळीत असलेले पहिले आणि त्यांना वाटले, ‘चलती चाकी देखकर, कबीरा दिया रोय । दुइ पाटन के बीच में, साबुत बचा ना कोय ॥’ जन्म आणि मृत्यू हे या जात्याचे दोन पाळू व यामध्ये या जगाचे पीठ होत आहे. हे बघून संत कबिरांना खेद झाला व ते रडू लागले. कारण ‘ऐसी कळवल्याची जाती’ ‘करी लाभाविण प्रीती’ तु.म. ‘संत हृदय नवनीत सामना’ श्री तुलसीदास मग नंतर त्यांच्या लक्षात आले कि ‘चाकी चाकी सब कहे, और किली कहे न कोय। जो कीली से लाग रहे, बाको बाल ना बाका होए ।।’ सगळे जात्याकडेच पाहतात. मधल्या खिळ्याकडे किंवा छोटा खुंट्याकडे कोणी पाहत नाही. जे दाणे त्या मधल्या खिळ्याला धरून राहतात. त्यांचे मात्र पीठ होत नाही. तसे एका भगवंताला स्मरून जे राहतात. त्यांना जन्म मरणाचा त्रास होत नाही.संत कबीरांनी याच जात्याचे आणखी वेगळे अर्थ सांगितले आहेत व अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ये दुनिया कितनी बाबरी, जो पत्थर पुजन जाये’ ‘घरकी चाकी कोई ना पूजे, जाका पिसा खाय कबीरा।। पत्थर पुजे हरी मिले, तो मैं पुजू पहाड। इससे तो चाकी भली। पिसा खाये संसार।।’ हि दुनिया किती मूर्ख आहे. दगडाच्या देवाला देव समजतो. तो दगड तर काही देत नाही पण घरचे जाते जे दगडाचेच असते त्याची कोणी पूजा करीत नाही, खरे तर ते जाते धान्य दळून त्याचे पीठ देते. आणि हो ! दगडाची पूजा करून जर हरीची प्राप्ती होत असेल तर मी एक मोठा डोंगर पुजतो. यापेक्षा तर जाते श्रेष्ठ आहे. कारण त्यानेच दळलेले पीठ सारे जग खात आहे. तात्पर्य याच जात्याचे अनेक प्रकारे संतांनी अर्थ करून आपल्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केला आहे.श्री नाथ बाबा आणखी एका रूपकात्मक अभंगात म्हणतात, ‘येई वो कान्हाई मी दळीन एकली’ एकली दळीता शिणले हात लावी वहिली’ ‘वैराग्य जाते मांडूनी विवेक खुंटा थापटोनी’ ‘अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैराणी घातले’ ‘स्थुल सूक्ष्म दळियेले देह कारणासहित’ ‘महाकारण दळियेले औट मात्रेसहित’ ‘दशा दोन्ही दळिल्या व्दैत अव्दैतासहित दाही व्यापक दळियेले चवदा भुवनांसहित’ ‘एकविस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित’ ‘सप्त पाताळे दळियेली सप्तसागरासहित’ ‘बारा सोळा दळियेल्या सत्रावी सहित’ ‘चंद्रसुर्य दळियेले तारांगणासहित’ ‘ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानासहित’ ‘मी तूं पण दळियेले जन्ममरणासहित’ ‘ऐसे दळण दळियेले दोनी तळ्यासहित’ ‘एका जनार्दनी कांही नाही उरले व्दैत’असे हे ज्ञान अज्ञानविरहित स्वरूपभूत ज्ञानाचे दळण आहे. ज्यामध्ये अहं र्ब्हम्हस्मी हा सुद्धा भाव राहत नाही कारण आता द्वैत राहिलेच नाही. ‘सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नानास्ती किंचन’ हा प्रातिभ अनुभूती येते.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागवाताश्रम चिचोंडी (पाटील)ता. नगरमो. ९४२२२२०६०३ . 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर