फार वर्षांपूर्वी एका गावातील आश्रमात गुरूंबरोबर काही शिष्य राहायचे. एके दिवशी गुरूंनी शिष्याला एक दगड दाखवला व विचारले की, या दगडाची किंमत काय असेल? शिष्य आश्चर्याने त्या दगडाकडे पाहत राहिला. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते की, या दगडाची अशी काय किंमत असेल? बुचकळ्यात पडलेल्या शिष्याला बघून गुरू म्हणाले, ‘जा, जरा बाजारात जाऊन याची किंमत काय असावी ते विचारून ये. पण लक्षात ठेव की, हा दगड कोणालाही विकायचा नाही. शिष्य बाजाराकडे निघतो. रस्त्यात एक शेतकरी भेटतो. त्याला थांबवून तो विचारतो की, आपण मला सांगू शकाल, की या दगडाची तुम्ही काय रक्कम देऊ इच्छिता? शेतकरी म्हणतो, ‘याची ती काय किंमत? एक रुपया ठीक आहे’. शिष्य पुढे जाऊन एका दुकानदाराला विचारतो की, या दगडाची काय किंमत असू शकेल? दुकानदार उत्तर देतो, ‘दहा रुपये’. शिष्याच्या मनात येते की, आणखी दोन-चार व्यक्तींना विचारायला हवे. तो एका सोनाराला विचारतो. सोनार सांगतो, मी याचे हजार रुपये देऊ शकतो. हे ऐकून शिष्य तोंडात बोट घालतो. आता मात्र त्याच्या मनातली उत्सुकता वाढते. तो राजाकडे जातो व विचारतो, ‘राजन, तुम्ही या दगडाची काय किंमत आकाराल?’ राजा म्हणतो, ‘या दगडाच्या किमतीत मी माझे पूर्ण राज्य द्यायला तयार होईन.’ शिष्य हे ऐकून तो दगड परत घेऊन धावत आश्रमात पोहोचतो. गुरूंसमोर जाऊन प्रश्न करतो की, ‘गुरुदेव, मला खरं सांगा. हा दगड नक्की काय आहे? राजा तर दगडाच्या बदल्यात पूर्ण राज्य द्यायला तयार आहे.’ तेव्हा गुरू शांत मुद्रेने उत्तर देतात, ‘या दगडाला पारस म्हणतात. लोखंडाला जर याचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. समजले? अर्थातच मूल्यहीन वस्तू ही मूल्यवान होते. सत्याचा बोध होण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा स्पर्श आपल्या बुद्धीला होण्याची गरज आहे. ज्याद्वारे समस्यांचे समाधान सहजरीत्या आपण करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणास मिळते.- नीता ब्रह्मकुमारी
पारसस्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:26 IST