ऑनलाइन खरेदी आधुनिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. सवड, आवड आणि मनपसंत खरेदीचा मेळ घालणारी ऑनलाइन खरेदी ही कोणालाही हवीहवीशी वाटणारच. फार पूर्वी खरेदीची सर्व साधनं ही पुरुषकेंद्री होती. आपल्या आजी-आजोबांच्या काळात होतं तसं. म्हणजे वाणसामानाची खरेदी करण्यापासून ते दिवाळीत कपड्या-लत्त्यांची खरेदी करण्यापर्यंत सर्व प्रकारची खरेदी घरातील पुरुषच करायचे. तिथे घरातल्या बाईच्या चॉइसला, तिच्या मताला फार किंमत नसे. पण जसजशी व्यवस्था बदलत गेली तसा घर-स्वयंपाकघरापुरती असलेल्या महिलांच्या वावरानं घराचा उंबरठा ओलांडला. जबाबदारीच्या नावाखाली घरातली-घराबाहेरची अनेक कामं महिलांनीच करणं अपरिहार्य झालं. त्यात स्वत:साठीची, घरासाठीची खरेदीही आलीच. दुकानात-बाजारात-मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याची हातखंडा असलेल्या महिलांना आता ऑनलाइन शॉपिंगची ट्रिकही जमली आहे. ऑनलाइन खरेदीसंदर्भात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले. त्यात ऑनलाइन खरेदीत महिलांच्या सहभागाच्या वाढलेल्या टक्क्यावर प्रकाश टाकला आहे. या सर्वेक्षणाच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन शॉपिंगचा वेग जगभरात वाढला आहे आणि भारतीय महिलांनीही या वाढत्या वेगाशी आपली चाल मिळतीजुळती केली आहे. ऑनालाइन शॉपिंग करण्याचा भारतीय महिलांचा झपाटा पाहिल्यास येत्या तीन वर्षांत ऑनलाइन शॉपिंगद्वारे होणार्या एकूण उलाढालीत भारतीय महिला साधारणत: तीनशे कोटींच्या व्यवहाराचं योगदान देणार आहेत.असा या सर्वेक्षणाचा ठाम निष्कर्ष आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांचा ऑनलाइन वावर वाढला असून, त्यांच्या हातातल्या आधुनिक गॅझेटस्मुळे तर हा वावर आणखीनच सुलभ झाला आहे. आर्थिक बाबतीत मिळवलेल्या स्वावलंबनामुळे आर्थिक विश्वात आत्मविश्वासानं वावरण्याचं त्यांचं बळ वाढलं आहे. आज त्याचाच परिणाम आहे की, महिलांची इ-शॉपिंग आणि त्याद्वारे होणारी आर्थिक उलाढाल वाढली आहे.ऑनलाइन खरेदी करताना महिलांची पहिली पसंती ही अर्थातच फॅशनेबल कपडे, ज्वेलरी, घरातल्या सुशोभीकरणाच्या वस्तू, लहान मुलांचे प्रोडक्टस् यांनाच जास्त असल्याचं सर्वेक्षणात आढळलं आहे. ऑनलाइन खरेदी म्हणजे खरेदीचा सहज पर्याय असं कोणीही म्हणेल. पण रूढ मार्गानं खरेदी करताना फसवणुकीचे जेवढे धोके असतात तितकेच किंबहुना जास्त धोके ऑनलाइन खरेदीला असतात. खरेदीसाठीची ऑनलाइन खिडकी उघडताना म्हणूनच आपली प्रत्येक क्लिक दहा वेळा विचार करूनच दाबलेली असावी. ऑनलाइन खरेदी करताना थोडं शहाणपण बाळगल्यास ही खरेदीही नेहमीच्या खरेदीसारखीच अगदी चोखंदळपणे करता येते. मोह की गरज?महिलांना खरेदीची आवड आहे. हा महिलांचा स्वभाव जगभरातल्या बाजारव्यवस्थेला चांगलाच ठाऊक आहे. आणि म्हणूनच महिला ग्राहक लक्षात घेऊनच कोणत्याही वेबसाइट आणि सॉफ्टवेअरचं डिझाईन केलं जातं. तुम्ही तुमचे फेसबुकचे अकाउंट चेक करत आहात तर तुम्हाला एका बाजूला ड्रेस किंवा साड्यांच्या विविध ऑफर्स पाहायला मिळतात. आकर्षक ऑफर्स आणि आणि भरमसाट पर्यायांच्या गर्दीत मोहाला आवरून आपल्या नेमक्या गरजांना ओळखून मगच खरेदी करण्याचा शहाणा निर्णय महिलांना घेता यायला हवा. वेबसाइट सुरक्षित आहे का?तुमची ऑनलाइन खरेदी तेव्हाच सुरक्षित असते जेव्हा तुम्ही खरेदीसाठी निवडलेली वेबसाइट सुरक्षित असते. वेबसाइटवर सुरक्षिततेचं चिन्ह दिलेलं असतं. ते असेल तरच तिथून खरेदी करावी. ऑनलाइन खरेदीच्या ज्या चांगल्या साइटस् उपलब्ध आहेत त्यावर खरेदीच्या मूल्यमापनाचे अहवालही उपलब्ध असतात. खरेदीसाठी क्लिक करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर फिरून यावं. अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का? हे आधी तपासायला हवंवस्तूची मागणी करण्याआधी..वस्तूची खरेदी ऑनलाइन करण्याआधी वस्तूची पूर्ण माहिती घ्यावी. नेहमीची खरेदी करताना जसं चार दुकानं फिरून आल्याशिवाय आपण साधा झाडूसुद्धा घेत नाही तसंच एखाद्या साइटवरची वस्तू जरी आपल्याला आवडली असली तरी त्यासंबंधीच्या आणखी दोन चार साइटस्ची माहिती काढून तिथे फेरफटका मारून यावा. कपडे, ज्वेलरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटस् यांची मागणी ऑनलाइन करण्याआधी जवळच्या दुकानात जाऊन त्या हाताळून पाहायला हव्यात. ऑनलाइन पेमेंट. जरा जपूनच!ऑनलाइन खरेदी करणं म्हणजे ऑनलाइन पेमेंट करणं आलंच. खरेदीचं पेमेंट जर आपल्या क्रेडिट कार्डवरून होणार असेल तर पेमेंटची माहिती स्वत:च्या हातानं भरावी. इतरांना ती भरू देऊ नये. यामुळे आपल्या क्रेडिट कार्डची सुरक्षा धोक्यात येते. क्रेडिट कार्डच्या मागे बारा अंकी नंबर असतो. शेवटचे तीन नंबर म्हणजे क्रेडिट कार्डची चावी असतात. ते इतरांना समजू देवू नये आपण ऊठसूट जरी ऑनलाइन खरेदी करत नसलो तरी आपलं इंटरनेट बँकिंगचं अकाउंट ऊठसूट चेक करावं. नेट चालू केल्यावर एकदा आणि बंद करण्याआधी एकदा अकाउंट चेक करणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं उचित असतं. क्रेडिट कार्डनं खरेदीचं पेमेंट करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर तुमचं ऑनलाइन खरेदीचं अकाउंट हँग होऊ शकतं. सायबर कॅफे, इतरांचं नेट असुरक्षितचऑनलाइन खरेदी ही शक्यतो स्वत:च्या कॉम्प्युटरवरून स्वत:च्या नेटवरून करावी. सायबर कॅफेचा पर्याय सुरक्षित नाही. अगदीच नाईलाज असल्यास आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर अँटीव्हायरस अँक्टिव्ह आहे की नाही हे आधी पाहावं. सायबर कॅफेमधील कॉम्प्युटर अनेक जण हाताळतात. आणि आपण इंटरनेटवर केलेले व्यवहार हे गोपनीय राहात नाही. ब्राऊजरमध्ये खरेदीसाठी निवडलेल्या साइटस्ची नोंद झालेलीच असते. त्यामुळे हे व्यवहार इतरांना माहीत होण्याची शक्यता जास्त बळावते. आपण इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार कितीही गोपनीय ठेवण्याचे प्रयत्न केले तरी इंटरनेटवर आपल्या व्यवहाराचे ठसे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उमटलेलेच असतात. त्यामुळे खरेदीसाठी आपलाच कॉम्प्युटर अन् आपलंच नेट वापरावं.‘सखी’ प्रतिनिधीसंदर्भ सहाय्य- प्रा. दिलीप फडके, - भाग्यश्री केंगे
सहज, सोपी तरीही काळजीची ऑनलाइन शॉपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2014 14:27 IST