सामुदायिक विवाह सोहळा संपन्न , दिव्यांगांच्या संसारांना दिल्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:30 IST2017-12-03T23:29:46+5:302017-12-03T23:30:02+5:30
जगाच्या इतिहासात शारीरिक अपंगत्व असलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्यातील उणीवावर मात करीत रडत न बसता दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी घोडदौड केली

सामुदायिक विवाह सोहळा संपन्न , दिव्यांगांच्या संसारांना दिल्या शुभेच्छा
पालघर : जगाच्या इतिहासात शारीरिक अपंगत्व असलेल्या अनेक व्यक्तींनी आपल्यातील उणीवावर मात करीत रडत न बसता दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी घोडदौड केली असून वंदेमातरम संस्थाही आपला वेगळा ठसा उमटवित असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी रविवारी पालघर येथे केले.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून वंदेमातरम अंध - अपंग सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून पालघरच्या विठ्ठल मंदिर सभागृहात सामुदायिक विवाह सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राजेंद्र गावीत यांनी हा सोहळा आपल्याच घरातील एक सोहळा असल्याचे सांगून समाजातील एका महत्वाच्या घटकांना लग्नाच्या बंधनात पाहतांना खुप खुप आनंद होतोय असे सांगितले. तर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योजक शंकर शेट्टी यांनी शारीरिक अपंगत्वामुळे अनेक व्यक्ती विवाह करत नाही मात्र वंदेमातरम संस्थेने एक स्तुत्य उपक्र म हाती घेतला आहे असे सांगून आपल्या हॉटेल व्यवसायात दिव्यांगांना रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन देऊन वधुवरास आशीर्वाद दिले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष निनाद सावे यांनी वंदेमातरम संस्था विविध प्रकारच्या उपक्र मातून अंध व अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याचे उत्तम काम करित आहे असे सांगितले.
या सोहळ्याचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत यांनी केले. यावेळी संस्थेचे सल्लागार अशोक चुरी, प्रमोद पाटील, डॉ राजेंद्र चव्हाण, निता राऊत, इसामुददीन शेख, संस्थेच्या सचिव निता तामोरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. या जोडप्यांना रोटरी क्लबच्या वतीने फॅॅॅन देण्यात आले. माजी राज्य मंत्री राजेंद्र गावित यांनी चार मंगळसूत्रे तर उत्तम पिंपळे, शंकर शेट्टी, पोनि.किरणकुमार कबाडी, रिफक लुुुलानिया यांनी कन्या दानासाठी लागणारी सर्व भांडी भेट दिली. तसेच इतरही सामाजिक कार्यकर्तेंकडून सहकार्य लाभले.