ठाण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:41 IST2018-10-23T21:35:46+5:302018-10-23T21:41:17+5:30
भावालाच ठार मारण्याची धमकी देत एका नराधम पित्याने आपल्याच सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या अत्याचाराला अखेर वाचा फुटली.

भावाला मारण्याची दिली होती धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भावाला मारण्याची धमकी देऊन आपल्याच अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणा-या माणिक गायकवाड (४२, नावात बदल) या सावत्र पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याच्या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघड झाला.
घोडबंबदर रोडवरील कॉसमॉस साईट जवळ राहणा-या या १६ वर्षीय सावत्र मुलीला ती घरात एकटीच असतांना माणिक तिच्याशी लगट करायचा. कालांतराने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने नकार दिल्यानंतर तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तो अत्याचार करीत होता. याच दरम्यान ती गरोदर राहिली. अत्याचाराची त्याने कहर केल्याने तिने अखेर धाडस दाखवून याप्रकरणी २२ आॅक्टोंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पोस्को), विनयभंग आणि लैंगिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली.