ठाण्यात गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:26 IST2018-02-15T18:10:00+5:302018-02-15T18:26:52+5:30
खासगी क्लासमधून घरी परतणा-या मानपाडयातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वीचा प्रकार
ठाणे: किती वाजले? असे विचारण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन मानपाडयातील एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार मनोरमानगर भागात तीन महिन्यांपूर्वी घडला. आधी भीतीपोटी आपल्या कुटूंबियांना तिने हा प्रकार सांगितला नव्हता. ती गरोदर राहिल्याने याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिडीत मुलगी १ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मनोरमानगर येथील एका खासगी शिकवणीवरुन पायी तिच्या घरी जात होती. त्याचवेळी गुरुकुल हायस्कूलजवळ एका २० ते २२ वर्षीय तरुणाने टाईम विचारण्याच्या बहाण्याने तिच्याशी संवाद साधला. ती काही बोलण्यापूर्वीच त्याने उजव्या हाताने रुमालाने तिचे तोंड दाबले. त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे वाटल्यानंतर त्याने तिला गुरुकूल शाळेजवळील गल्लीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकारानंतर त्याने तिथून पळ काढला. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तपासणीत हा सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर आता एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार करुन पसार झालेल्या या तरुणाचा आता शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.