पॉवर हाऊस? छे! हे तर अनेक अनैतिक धंद्यांचे केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:56 AM2017-11-27T06:56:08+5:302017-11-27T06:56:08+5:30

पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले जात आहे.

 Power House? Hi! This is the center of many immoral businesses! | पॉवर हाऊस? छे! हे तर अनेक अनैतिक धंद्यांचे केंद्र!

पॉवर हाऊस? छे! हे तर अनेक अनैतिक धंद्यांचे केंद्र!

Next

- प्रशांत माने, डोंबिवली

पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले जात आहे. पण ठाकुर्लीजवळील बावनचाळीचा परिसर पाहता, स्मार्ट सोडा पण आहे तेच आधी सुधारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. इथेही विकास बेपत्ता झाल्याने एखाद्या भकास खेड्यात आलो की काय, असा भास होण्याइतकी येथील परिस्थिती भीषण आहे.

ल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील; परंतु रेल्वेची हद्द म्हणून ओळखल्या जाणाºया ठाकुर्ली पश्चिमेकडील बावनचाळ परिसराला दोन दशकांपासून अवकळा आली आहे. एकीकडे रेल्वेची अनास्था आणि महापालिका प्रशासनाचे (ठरवून?) होत असलेले दुर्लक्ष यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाºया कल्याण-डोंबिवलीतील हा भाग विकासापासून आजवर कोसो दूर राहिला आहे. वसाहतीतील बहुतांश घरांची पडझड झाली असून नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा आणि सुरक्षेअभावी अनैतिकतेचा बिनदिक्कत होत असलेला व्यापार पाहता एकेकाळी वीज निर्मिती केंद्र असल्याने पॉवर हाऊस म्हणून नावाजलेला हा भाग आता ‘अनैतिक धंद्यांचे हाऊस’ म्हणून नावारूपाला आला आहे. हद्दीच्या वादात एखाद्या वसाहतीची कशी परवड होते, याची प्रचिती बावनचाळीचा परिसर पाहताना येते.
१९२९ मध्ये याठिकाणी कोळशावर चालणारे औष्णिक वीज निर्मिती केंद्र रेल्वे प्रशासनाने सुरू केले. हे केंद्र उभे राहताना रेल्वेच्या अधिकाºयांसाठी ठाकुर्लीच्या पूर्वेकडील भागात अधिकाºयांसाठी जी घरे बांधण्यात आली. त्याला ‘बारा बंगला’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्याच्या बाजूलाच बांधलेल्या तीन-तीन अशा छोटया खोल्या या सर्व्हंट क्वाटर्स म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. कालांतराने ठाकुर्लीच्या पश्चिमेकडील भागात उभ्या राहिलेल्या सर्व वसाहतीला मिळून बावनचाळ असे नाव पडले.
याठिकाणी रेल्वेचे वर्ग २ आणि ३ मधील अधिकारी, कर्मचारी राहायचे. त्यांच्यासाठी जी, एच टाईपसह निसन हट (गोलाकार लोखंडी तंबू) आदींची बांधकामे करण्यात आली. के आणि जे टाईप चाळींमध्ये चतुर्थश्रेणी कामगार वास्तव्य करू लागले. याठिकाणी खलाशांसाठी जागा दिल्या होत्या. एकंदरीत साधारण १५० खोल्यांचा समावेश असलेले बंगले, इमारती, चाळी उभारल्या गेल्या.
बावनचाळीचा परिसर १७० एकराचा आहे. १९८७ मध्ये घडलेल्या एका अपघाताच्या घटनेने येथील जीवनमान पूर्णपणे बदलून गेले. वीजनिर्मिती केंद्रातील बॉयलर जीर्ण असल्याने त्याचा स्फोट झाला. यात सात कर्मचारी जागीच ठार झाले होते. याचा परिणाम म्हणजे येथील कामगार संघटनांनी कोळशावर वीज निर्मिती नको, ती गॅसवर करा अशी मागणी लावून धरली. कोळशामुळे बाहेर पडणाºया कणांमुळे प्रदूषणातही भर पडत होती. यातून काजळी निर्माण होऊन ती घराघरात जमत असे. त्यातच थेट चंद्रपूरहून कोळसा आणावा लागत असल्याने हे केंद्र तोट्यात गेले होते. अखेर, कोळशावर वीज निर्मिती नको ही वाढती मागणी पाहता ठाकुर्लीतील हे केंद्र बंद करून येथील कामगारांना इतरत्र नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. ज्या कामगारांना स्वेच्छानिवृती हवी किंवा स्वेच्छा बदली घ्यायची आहे ते घेऊ शकतात, अशी घोषणा करण्यात आली. काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर मुलांचे भवितव्य मुंबईतच घडू शकते या कल्पनेने काहींनी बावनचाळीतच वास्तव्य करून माटुंगा, सीएसटी, कुर्ला येथील रेल्वेच्या प्राधिकरणांमध्ये नोकरी स्वीकारली. २००० साली हे वीजनिर्मिती केंद्र पूर्णपणे बंद करण्यात आले. ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री असताना त्यांनी येथे नैसर्गिक वायूवर आधारित ७०० मेगावॅटच्या वीजनिर्मिती केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. परंतु ती आजतागायत कागदोपत्रीच राहिली. नंतरच्या काळात ही जागा चौपाटीसाठी, मनोरंजन केंद्रासाठी मागण्यात आली. पण रेल्वेने त्याला नकार दिला. त्यानंतर आता ही जागा टप्प्याटप्प्याने विकसित केली जात आहे. आता या केंद्राच्या काही भागात लोकलसाठी यार्ड उभारण्यात आले आहे. २० ते २५ लोकल उभ्या केल्या जातात. भविष्यात केंद्राच्या ठिकाणी एलेव्हेटेड रेल्वे टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे. ठाकुर्ली स्थानकाचा विस्तार, तेथील क्रॉसिंग बंद करून उभारला जाणारा पूल आणि रेल्वेच्या प्रकल्पामुळे पॉवर हाऊसचा परिसर वेगाने कात टाकतो आहे. पण बावनचाळींच्या परिसराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने त्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे.

भूखंड विकण्याचा घाट
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात निवासी भाग वगळता मोकळा असलेला भूखंड विकण्याचा घाट घातला होता. त्यासाठी या भागाचे सर्वेक्षणही केले होते. मात्र ही प्रक्रिया बारगळली. कालांतराने याठिकाणी प्रस्तावित ठाकुर्ली टर्मिनस तर सोडाच वीज निर्मिती केंद्रही आजवर उभे राहू शकलेले नाही.

सापत्न वागणूक : सद्यस्थितीला पडझड झालेली भग्नावस्थेतील घरे, रस्त्यांची दुरवस्था, आजूबाजूला वाढलेले रान, बंद पथदिवे या परिस्थितीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, गर्दुल्ले, प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे येथे सर्रास सुरू असतात. रेल्वेची हद्द असूनही ते करीत असलेले दुर्लक्ष आणि महापालिका क्षेत्रात येऊनही विकासकामांना मिळत नसलेला वाव पाहता या भागाला एकप्रकारे सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना येथील रहिवाशांची झाली आहे.

Web Title:  Power House? Hi! This is the center of many immoral businesses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.