Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:41 PM2021-04-13T23:41:14+5:302021-04-13T23:41:46+5:30

Maharashtra Lockdown : परप्रांतीय कामगारांअभावी काही कारखान्यांतील उत्पादन व काही बांधकाम क्षेत्रावर खूप परिणाम झाल्याने तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra Lockdown: Workers-entrepreneurs stunned by fear of lockdown! | Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे

Next

- पंकज राऊत

बोईसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घातलेले थैमान आणि कधीही लॉकडाऊन जाहीर होण्याची स्थिती असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक व बांधकामासह अनेक क्षेत्रात काम करणारे परप्रांतीय कामगार धास्तावले असून ते त्यांच्या मूळगावी परतायला लागले आहेत. यामुळे कामगारांअभावी उद्योजकांना मुदतीत पूर्ण न होणाऱ्या उत्पादनाची तर विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची चिंता वाटू लागली असून ते धास्तावले आहेत.
मागील वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार कुटुंबासह डोक्यावर बोजाबिस्तारा घेऊन कुणी चालत तर कुणी जे वाहन मिळेल त्याचा आधार घेऊन प्रचंड हालअपेष्टा सहन करून आपापल्या गावी गेले होते. ते दिवाळीनंतर हळूहळू परतले आहेत. दरम्यान परप्रांतीय कामगारांअभावी काही कारखान्यांतील उत्पादन व काही बांधकाम क्षेत्रावर खूप परिणाम झाल्याने तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कामगार कुठे व किती ?
जिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा व डहाणू येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत, तर महत्त्वाच्या सर्व शहरांमध्ये व तालुक्याच्या ठिकाणी इमारती व व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असून हॉटेल तर गावागावात असून अशा विविध क्षेत्रात काम करीत असलेले लाखो परप्रांतीय कामगार आज द्विधा मनस्थितीत आहेत. 

सर्वच क्षेत्रांचे होणार नुकसान
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध आणि लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांशिवाय पर्याय नाही. मात्र स्टील, केमिकल कारखाने, कापड उद्योगासह बांधकाम क्षेत्रातही परप्रांतीय कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून ते धास्तावून गावी परतू लागले आहेत. याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार चिंतित आहेत. ते आपल्या राज्यात जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. त्यांना थोपवून ठेवणे जिकिरीचे असून  ते कामगार त्यांच्या गावी गेल्यानंतर उत्पादनावर निश्चितच परिणाम होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच सक्षमपणे संबंधित यंत्रणेने रोखणे आवश्यक आहे. तारापूरच्या उद्योजकांनी आपल्या कारखान्यातील कामगारांची रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू केली आहे, मात्र सदर टेस्ट किटच्या उपलब्धतेवर  मर्यादा  असल्याचे जाणवते. एकूण परिस्थिती गंभीर वळण घेत  असल्याचे  दिसते म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
- डी.के. राऊत, अध्यक्ष  तारापूर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन(टिमा)

कधीही लॉकडाऊन होण्याची शक्यता व आमच्या मनामध्ये कोरोनाविषयी असलेल्या प्रचंड भीतीबरोबरच येथे आमच्याजवळचे फारसे नातेवाईकही नसल्याने आम्हाला आमच्या गावी परतावेसे वाटते. आम्ही त्या दृष्टीने तयारीलाही लागलो आहोत.
- सतू शर्मा, कामगार

मागील वर्षी गावी परतताना आमचे झालेले प्रचंड हाल पाहता आता रेल्वे गाड्या व इतर वाहतूक सुरू असल्याने आम्ही सुखरूप व लवकर आमच्या घरी पोहचू. कारण जर लॉकडाऊन सुरू झाले तर येथील आमचे काम कमी किंवा बंद होण्याची शक्यता असून आमच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
- विनोद साह, कामगार

Web Title: Maharashtra Lockdown: Workers-entrepreneurs stunned by fear of lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.