लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करणा-या ‘त्या’ कैद्याने अखेर सोडले उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 10:55 PM2017-10-13T22:55:43+5:302017-10-13T22:55:55+5:30
आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे: आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे. काही अधिकारी आणि कारागृहाचे डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये त्याने दूध आणि पावावर हे उपोषण संपविल्याचे जाहीर केल्याने कारागृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.
आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असून याबाबत केलेली डीएनए तपासणी देखिल निगेटीव आल्याचा दावा त्याच्यासह त्याच्या कुटूंबियांनी केला होता. त्याच्या उपोषणाची दखल घेत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्याचे आदेशही जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनीही उपोषण मागे घेण्यासाठी त्याला आवाहन केले होते. कारागृह प्रशासनानेही त्याच्यापुढे हात टेकले होते. मध्यंतरी त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला अनेक दिवस सलाईनवरही ठेवण्यात आले होते. शुक्रवारी ४१ व्या दिवशी मात्र त्याने आपण उपोषण मागे घेत असून दूध आणि पावाची मागणी केली. त्याची ही मागणी तात्काळ पूर्ण करण्यात आली. यावेळी कारागृह अधिकारी एच. बी. पाटील, गुंजाळ आणि डॉ. ए. आर. रंगारी आदी उपस्थित होते.
कुटुंबीयांचीही होणार भेट
त्याने उपोषणाचा हट्ट धरल्यामुळे त्याची न्यायालयातील सुनावणी आणि कुटूंबियांच्या भेटीसाठी त्याला नियमानुसार बंदी घालण्यात आली होती. त्याला वेगळया बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. आता मात्र काही क्षण का होईना त्याला त्याच्या कुटूंबियांची भेट घेण्याचीही मुभा देण्यात येणार आहे.