लाचखोर महिला पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:45 IST2018-06-19T18:45:11+5:302018-06-19T18:45:11+5:30
बलत्काराच्या गुन्ह्यात आपसी समेट घडवून आणण्याकरिता तक्रारदाराला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या सेलू पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

लाचखोर महिला पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
सेलू - बलत्काराच्या गुन्ह्यात आपसी समेट घडवून आणण्याकरिता तक्रारदाराला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या सेलू पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राजश्री रामटेके असे या कर्मचाºयाचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी दिली. ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रार कर्त्याच्या धाकट्या भावाविरोधात सेलू पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पीडित महिलेने प्रकरण आपसातील असल्याने प्रतिज्ञापत्रावर पुढील कारवाई न करण्यासाठी विनंती केली होती; परंतु सदर गुन्ह्यात तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा पथकाने १ जुन रोजीच पडताळणी केली होती. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू पोलीस ठाण्यात सापळा रचला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेकेला तक्रार कर्त्याकडुन २५ हजार रुपये रोख स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्या कडून लाचेच्या स्वरुपात स्वीकारण्यात आलेली रक्कमही हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक नागपूर पी. आर. पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस नाईक अतुल वैद्य, श्रीधर उईके, रोशन निंबाळकर, सागर भोसले, विजय उपासे यांच्यासह महिला पोलीस शिपाई लिना सुरजुसे यांनी केली.