आॅर्केस्ट्रा बारला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद? पुन्हा अश्लील प्रकार वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:56 IST2017-10-20T05:55:08+5:302017-10-20T05:56:41+5:30
मीरा- भार्इंदरमध्ये आॅर्केस्ट्रा बारच्याआड चालणाºया अश्लील व अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द केले.

आॅर्केस्ट्रा बारला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद? पुन्हा अश्लील प्रकार वाढणार
मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये आॅर्केस्ट्रा बारच्याआड चालणाºया अश्लील व अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द केले. मात्र गृह खात्यानेच महसूल विभागाच्या आदेशाला स्थगिती देत तब्बल ३५ आॅर्केस्ट्रा बार सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे.
मीरा- भाईंदर म्हणजे लेडीज आॅर्केस्ट्रा बार व लॉजींगचा सुकाळ आणि त्यातून चालणा-या अश्लील अनैतिक तसेच वेश्याव्यवसायाच्या प्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यातूनच आॅर्केस्ट्रा बार व खेटूनच असणा-या लॉजमधून कोट्यवधींची होणारी उलाढाल डोळे दिपवणारी आहे. आॅर्केस्ट्रा बार मधून गायिकांच्या नावाखाली असलेला बारबालांचा राबता व बेधडक चालणारे नृत्य. गायकांच्या नावाखाली सीडीवरच वाजवली जाणारी गाणी. नियमापेक्षा अधिक संख्येने बारबालांची रेलचेल. पोलिसांची धाड पडलीच तर बारबालांना लपवण्यासाठी गुप्त खोल्या आढळल्या आहेत. बहुतांश आॅर्केस्ट्रा बार व लॉजची बांधकामे बेकायदा असतानाही महापालिका व लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने अगदी पोलीस खात्यासह अन्य तक्रारी असूनही त्यावर ठोस तोडक कारवाई होत नाही. आता तर अरविंद शेट्टी, गणेश शेट्टी आदी बार व लॉज चालकच नगरसेवक झाल्याने पालिका कारवाई करणे तक्रारदारांना अशक्य वाटत आहे.
महापालिका व लोकप्रतिनिधींकडून अनैतिक व अश्लील प्रकार चालणाºया आॅर्केस्ट्रा बार व लॉज च्या बेकायदा बांधकामांना पाठीशी घातले जात असताना दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र पालिकेकडे पत्रव्यवहार सुरूच ठेवले. तर आॅर्केस्ट्रा बारच्या विरोधात अटींचे उल्लंघन, दाखल गुन्हे, बेकायदा बांधकाम आदी मुद्यांवर सादरीकरण परवाने देऊ नये असा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले होते. तसेच सादरीकरण परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे पोलिसांनी आॅर्केस्ट्रा बार चालकांना नोटीसा बजावून आॅर्केस्ट्रा बंद पाडले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याशी डॉ. पाटील यांनी चर्चा करून आॅर्केस्ट्रा बारमधील चालणाºया प्रकारांची व दाखल गुन्हे आदींची माहिती दिली. पोलिसांच्या प्रस्तावानुसार तहसीलदार किसन भदाणे यांनी सप्टेंबरमध्ये ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द करुन टाकले होते.
शहरातील ४५ पैकी तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द झाल्याने बारचालकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी बार चालकांनी गृह विभागाकडे धाव घेतली. तहसीलदारांनी आधी दिलेली नोटीस ही परवाना स्थगिती बद्दलची होती. पण आदेश मात्र परवानाच रद्द केल्याचा दिला. शिवाय सादरीकरण परवान्याचे शुल्कही बार चालकांकडून भरुन घेण्यात आले होते असा दावा बार चालकांनी केला आहे.
गृह विभागाने या प्रकरणी १६ आॅक्टोबरला घेतलेल्या सुनावणीवेळी स्वत: तहसीलदार वा त्यांचा कोणी प्रतिनिधीच गेला नाही. विशेष म्हणजे गृह विभागाने आॅर्केस्ट्रा बार चालकांसाठी गतीमान कारभाराची चुणूक दाखवत तत्काळ दुसºया दिवशीच म्हणजे १७ आॅक्टोबरला तहसीलदारांच्या सादरीकरण परवाने रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देऊन टाकली. तहसीलदारांनी केलेली कार्यवाही सकृतदर्शनी अयोग्य असल्याचा ठपका ठेवतानाच अंतिम सुनावणी होईपर्यंत आॅर्केस्ट्रा बार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
पोलिसांच्या मोहीमेला खो
आतापर्यंत ३५ आॅर्केस्ट्रा बार चालकांना दिलासा देणारा निर्णय गृह विभागाने दिल्याने पोलिसांनी या आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाºया अश्लील व अनैतिक गैरप्रकारां विरुध्दच्या घेतलेल्या मोहीमेला खो बसला आहे. येथील बारमध्ये मुंबई, ठाणे, रायगड येथून ग्राहक मोठ्या संख्येने येतात.