अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी मनिषा वाळेकर विजयी तर उपनगराध्यक्षपदी अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:06 IST2017-11-21T15:06:45+5:302017-11-21T15:06:55+5:30
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने आज त्यांची या पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी मनिषा वाळेकर विजयी तर उपनगराध्यक्षपदी अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड
अंबरनाथ- नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने आज त्यांची या पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर शिवसेनेचे अब्दुल शेख यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर या निवडणुकीत भाजपा शिवसेनेसोबत आल्याने काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबरनाथ नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्व पक्षांनी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांना पाठिंबा देत त्यांची बिनविरोध निवड निश्चित केली होती. 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिका-यांनी मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केलं. नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहिर होताच शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी जल्लोश केला. तर उपनगराध्यक्षपदासाठी 21 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते.
मात्र उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकात चुकीची वेळ टाकण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मुळ आदेशात उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 12 अशी देण्यात आली. तर वेळापत्रकात तीच वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेर्पयतची देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेची मोठी पंचायत झाली होती. अचानक वेळेचा घोळ झाल्याचे लक्षात येताच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे अंबरनाथमध्ये येण्या आधीच अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक पालिकेत दाखल झाले. जिल्हाप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे नगरसेवक अब्दुल शेख यांचा अर्ज सकाळी 11. 55 वाजता भरण्यात आला. अब्दुल शेख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची देखील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली.
या निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गतनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले की,पालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष आणि भाजपा यांच्या युतीचे बहुमत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा मान राखत आम्ही उमेदवार दिलेला नाही. मात्र पालिका सभागृहात काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाची भूमीका ठाम पणो सांभाळेल असे स्पष्ट केले.