ट्रॅक्टर अंगावर घालून मंडलाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 20, 2017 17:12 IST2017-05-20T17:12:24+5:302017-05-20T17:12:24+5:30
सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ट्रॅक्टर अंगावर घालून मंडलाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. २0 : कृष्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती समजल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या मंडलाधिकारी प्रशांत कदम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियाने केला. याप्रकरणी गणेश शिंदे (रा. पाटखळ ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोरखळ ता. सातारा येथील कृष्णा नदीमध्ये वाळू उपसा होत असल्याची माहिती मंडलाधिकारी कदम यांना समजल्यानंतर ते दुचाकीवरून त्या ठिकाणी सकाळी सात वाजता गेले. यावेळी गणेश शिंदेने पळून जाताना कदम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कदम यांनी बाजूला उडी मारल्याने ते बालंबाल बचावले.
या प्रकारानंतर कदम यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश शिंदेवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.