साताऱ्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून व्यावसायिकाला दांडक्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:38 IST2017-11-02T17:31:45+5:302017-11-02T17:38:29+5:30
पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून येथील मंगळवार पेठेत बुधवारी रात्रीच्या सुमारास चिकन व्यावसायिकासह तिघांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात टॅक्सी गल्लीतील सुमारे ३० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये वाहनांची तोडफोड करण्याात आली आहे.

साताऱ्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून व्यावसायिकाला दांडक्याने मारहाण
सातारा ,दि. ०२ : पूर्वीच्या भांडणाच्या कारणातून येथील मंगळवार पेठेत बुधवारी रात्रीच्या सुमारास चिकन व्यावसायिकासह तिघांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात टॅक्सी गल्लीतील सुमारे ३० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये वाहनांची तोडफोड करण्याात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीत अय्याज निजाम खाटीक (वय ४९) हे चिकन व्यावसायिक राहतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी बकऱ्यांची झुंज लावण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा शहादाब व टॅक्सी गल्ली (सातारा) येथील काहीजणांशी भांडणे झाली होती. त्यावेळी ही भांडणे आपापसात मिटविली होती.
दि. ३१ आॅक्टोबर रोजी शहादाब खाटीक पालिकेसमोर गेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला शिवीगाळ व दमदाटी झाली होती. तर बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अनेकजण हातात लाकडी दांडके घेऊन खाटीक यांच्या घरी आले.
त्यावेळी तुम्ही का आलाय? असे विचारल्यावरून वादावादी झाली. यामध्येच अय्याज खाटीक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा भांडणे सोडविण्यास आल्यावर त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करण्यात आली.
याप्रकरणी सलमान शेख, स्वालीम, बबलू, आफताब, आकीब, मुस्तफा, वाहीद, आलीम रुस्तम शेख, इजाज, सुफियान इम्तियाज शेख, समीर शब्बीर शेख यांच्यासह इतर अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.
कार, दुचाकींचे नुकसान..
बुधवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी हल्लेखोरांनी घराजवळ असणाऱ्या कार, रिक्षा आणि सात ते आठ दुचाकींची लाकडी दांडक्याने मोडतोड केली. यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.