पोलिस ठाण्यातच पोलिस अधिका-याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:43 IST2017-08-11T20:43:22+5:302017-08-11T20:43:29+5:30
वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, फलटण) याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकास धस यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

पोलिस ठाण्यातच पोलिस अधिका-याला मारहाण
फलटण, दि. 11 - वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, फलटण) याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकास धस यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमार रणदिवे याने एका वडापाव गाड्यावर वडापाव खाल्ला. मात्र त्या व्यावसायिकाला पैसे दिले नाहीत. उलट विक्रेत्याकडेच त्याने पैसे मागितले. यावरून विक्रेता आणि रणदिवे यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर रणदिवेने वडापावचा गाडा उलटून लावला. या प्रकारानंतर संबंधित वडापाव चालक धावतच पोलिस ठाण्यात गेला.
पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस वडापावच्या गाड्याजवळ आले. तोपर्यंत रणदिवे तेथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक प्रकास धस यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. वादावादीविषयी धस त्याच्याकडे चौकशी करत असतानाच रणदिवे हा धस यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांना मारहाणही केली. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.
पोलिस निरीक्षक धस आणि संबंधित वडापाव चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.