पोलिसांच्या सोबतीला आता माजी सैनिक !
By Admin | Updated: February 12, 2017 22:31 IST2017-02-12T22:31:50+5:302017-02-12T22:31:50+5:30
विशेष दर्जा मिळणार: जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग

पोलिसांच्या सोबतीला आता माजी सैनिक !
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी माजी सैनिकांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे. या माजी सैनिकांना या काळात विशेष पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान तर २३ रोजी मतमोजणी होणार आहे. एकावेळी ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात होणार असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. सध्या उपलब्ध असणारे पोलिस बळ कमी पडणार असल्याने या कामासाठी माजी सैनिकांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. जे माजी सैनिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लवकरच आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवावे. याचबरोबर इच्छुक माजी सैनिकांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हा विशेष शाखा येथे संपर्क साधावा.
माजी सैनिकांनी आजपर्यंत देशाची सेवा अत्यंत उत्कृष्ठपणे बजावली असून, निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभागही देशसेवेचाच एक भाग आहे. यामुळे माजी सैनिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही निवेदनात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
या संघटनेचे सुमारे १०० च्या आसपास सदस्य या काळात पुन्हा पोलिस बंदोबस्तात सहभागी होणार असल्याची माहिती एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)
पोलिस पाटलांनाही आवाहन
सातारा तालुक्यातील निवडणूक खासदार आणि आमदार गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. या काळात एखाद्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या इतर घटना आणि घडामोडींची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी शुक्रवारी सातारा तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पोलिस पाटलांनी २३ पर्यंत गाव सोडून इतरत्र न जाण्याच्या सूचना केल्या
.