नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यामधील १,१८१ शेतकरी कुटुंबीयांना सावरले अपघात विम्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST2018-04-20T00:03:38+5:302018-04-20T00:03:38+5:30
सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले

नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यामधील १,१८१ शेतकरी कुटुंबीयांना सावरले अपघात विम्याने
नितीन काळेल ।
सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले असून, १८९ नामंजूर झाले आहेत. विम्यापोटी मिळणारी रक्कम संबंधित शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
दरवर्षी राज्यात विविध अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा असा अनैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबास हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शासन अशा शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मदत करते; पण अशा शेतकºयांसाठी कोणतेही विमा संरक्षण नव्हते. यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपूर्वी शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलण्यात येऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, असे ठेवण्यात आले.
एखाद्या अपघातात शेतकºयाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीच्या प्रस्तावानुसार दोन लाख रुपये कुटुंबीयांना मिळतात. तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, ही मदत देण्यात येणारे शेतकरी हे त्यांच्या नावे सातबारा उतारा असणारे आवश्यक आहेत. तसेच संबंधित शेतकºयांचे वय १० ते ७५ असावे, शेतकºयाला मृत्यू, अपंगत्व हे अपघातानेच येणे आवश्यक असावे व तो शेतकरी वाहन चालवित असल्यास परवाना आवश्यक असतो. तसेच रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्यामुळे मृत्यू आदींसाठी हा लाभ मिळतो.
सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत एकूण १४५८ प्रस्ताव हे अपघात विम्यासाठी कृषी विभागाकडे आले होते. ते सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेले. त्यापैकी ११८१ प्रस्ताव मंजूर झाले तर नामंजूर प्रस्तावांची संख्या १८९ राहिली. तर ८८ प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. जे प्रस्ताव नामंजूर झाले होते, त्यातील २३ हे मंजुरीस योग्य ठरले आहेत. तर मंजुरीस पात्रपैकी १४ प्रस्ताव हे न्यायालयात दाखल केले आहेत.
अपघात लाभाचे स्वरूप
अपघाती मृत्यू - दोन लाख रुपये
अपघातामुळे दोन डोळे निकामी होणे - दोन लाख रुपये
दोन अवयव निकामी होणे - दोन लाख रुपये
एक डोळा निकामी होणे - एक लाख रुपये
एक डोळा व एक अवयव निकामी होणे - दोन लाख
एक अवयव निकामी होणे - एक लाख रुपये