पोलादी अजिंक्यताऱ्यावर लोखंडाची चोरी
By Admin | Updated: October 13, 2015 00:18 IST2015-10-12T21:00:30+5:302015-10-13T00:18:10+5:30
किल्ल्याची वाट बिकट : मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या सातारकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजनेची गरज

पोलादी अजिंक्यताऱ्यावर लोखंडाची चोरी
सचिन काकडे- सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याकडेला बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून गेले आहेत, तर अनेक ठिकाणच्या पाईप चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. एवढे घडूनही संबंधित विभागाचे याबाबीकडे अजूनही दुर्लक्ष आहे. सुरक्षा रेलिंगची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणचे सौंदर्य नागरिकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे भल्या पहाटे आबालवृद्धांची किल्ल्यावर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होते. किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याची वाट सध्या बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगमधील अनेक लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत.
त्यामुळे रस्त्याकडेला केवळ खांबच उभे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे
चित्र असेच आहे. मात्र, संबंधित विभागाने याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही.
त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना धोका पत्करूनच चालावे लागते.
नवरात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कलावधीत किल्ल्यावर असणाऱ्या मंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक
मोठ्या संख्येने किल्ल्यावर
येतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती
उपाययोजना करावी, अशी
मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोखंडी पाईप गंजखात; जागोजागी खड्डे
रस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी पाईप गेल्या अनेक वर्षांपासून गंज खात पडल्या आहेत. पाईप कमकुवत झाल्याने चोरट्यांना त्या पाईप जमिनीतून काढणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे लोखंडी पाईप चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
अजिंक्यतारा किल्याकड येणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांचा कसरत करूनच या रस्त्यावरून चालावे लागले. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच पडले नाही. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे.
सुरक्षारक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती हवी
किल्ल्यावर चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वृक्षतोडीच्या घटनाही घडत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.