हसूरचा जलस्वराज्य प्रकल्प ठरला आदर्श
By Admin | Updated: February 15, 2015 23:40 IST2015-02-15T21:36:37+5:302015-02-15T23:40:48+5:30
नेटके संयोजन : आठ वर्षांपासून अखंडितपणे नळ पाणीपुरवठा; शंभर टक्के नळांना मीटर

हसूरचा जलस्वराज्य प्रकल्प ठरला आदर्श
संदीप बावचे - शिरोळ -शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊन गेली आठ वर्षे अविरतपणे शिरोळ तालुक्यातील हसूर येथे जलस्वराज्य प्रकल्प सुरू आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. शिवाय ग्रामीण भागातील शंभर टक्के नळांना मीटर असणारे तालुक्यातील हे पहिलेच गाव आहे. २००७-०८ साली हसूर येथे दहा टक्के लोकवर्गणीतून जलस्वराज्य प्रकल्पसाठी ६० लाख रुपयांचा निधी या योजनेतून खर्च करण्यात आला. नऊ गुंठे जागेवर पाण्याची टाकी, शुद्धिकरण यंत्रणा बसविण्यात आली. गावामध्ये वितरण व्यवस्था चांगल्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून तीन इंची व दोन इंची पाईपलाईन टाकण्यात आली. पाण्याचे नेटके नियोजन करीत असताना, तीन विभागांमध्ये प्रत्येक नळाला किमान दीड तास पाणी सोडण्यात येते. शंभर टक्के नळांना मीटर बसवून तीन महिन्यांतून एकदा रिडिंग घेऊन एक हजार लिटरला सहा रुपयांप्रमाणे आकारणी केली जाते. सरासरी तीन महिन्यांसाठी दीडशे रुपये पाणी कर घेण्यात येतो. नियोजनामुळे पाणी कर वसुलीदेखील ९० टक्के होते. विशेष बाब म्हणजे पाणी शुद्धिकरणासाठी टीसीएल न वापरता इस्त्राईल देशातून आणलेल्या मशीनमधून औषधांचे प्रमाण टाकून शेवटच्या नळापर्यंत शुद्ध पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांत अखंडितपणे नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. महावितरणचे वीज बिलदेखील वेळच्यावेळी जमा केले जाते.