खासगी सावकारी करणाऱ्या दोघांवर कऱ्हाड पोलिसांत गुन्हा
By Admin | Updated: August 28, 2016 00:02 IST2016-08-28T00:02:24+5:302016-08-28T00:02:24+5:30
वाळू ठेकेदाराची फिर्याद : पंधरा लाखांच्या मोबदल्यात चोवीस लाख

खासगी सावकारी करणाऱ्या दोघांवर कऱ्हाड पोलिसांत गुन्हा
कऱ्हाड : पैशांसाठी नजरकैदेत ठेवून दमदाटी केल्याप्रकरणी दोन खासगी सावकारांवर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुशेरे, ता. कऱ्हाड येथील वाळू ठेकेदार पांडुरंग अंतू जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
हणमंत राजाराम जगताप (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) व सचिन संपत आवटे (रा. कुंडल) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुशेरे येथील पांडुरंग जाधव यांनी वाळूचा ठेका घेतला होता. या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी वडगाव हवेलीतील हणमंत राजाराम जगताप यांच्याशी संपर्क साधला. हणमंत जगतापच्या मध्यस्थीने पांडुरंग जाधव यांना कुंडल येथील सचिन आवटे याच्याकडून पंधरा लाख रुपये मिळाले. हे पैसे त्यांना दोन हप्त्यात देण्यात आले. त्यानंतर मार्च ते जुलै या महिन्यांत वेगवेगळ्या हप्त्यात पांडुरंग जाधव यांनी २२ लाख रुपये आवटेला परत केले. आॅगस्ट महिन्यातही आणखी रक्कम दिली. व्याजासह त्यांनी एकूण २४ लाख रुपये आवटेला दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, पैसे देऊनही आवटे व जगताप यांच्याकडून पांडुरंग जाधव यांच्याकडे पैशाची मागणी केली जात होती. दोन दिवसांपूर्वी जाधव यांना त्यांनी कऱ्हाडातील एका हॉटेलमध्ये बोलवले. त्याठिकाणी चर्चा केल्यानंतर तीन तास चारचाकी गाडीत नजरकैदेत ठेवत ‘पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. जाधव यांनी ‘उद्या पैसे देतो,’ असे सांगितल्यानंतर सोडून दिले. दुसऱ्या दिवशी फोनवरून पैशासाठी धमकी दिल्यानंतर जाधव यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. (प्रतिनिधी)