सोनवडे परिसरात गव्यांचा धुमाकूळ; :नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:03 IST2018-05-25T19:03:51+5:302018-05-25T19:03:51+5:30
शिराळा तालुक्यातील सोनवडे, मणदूर, काळोखेवाडीत धूळवाफेच्या भात पेरणीची धांदल उडाली आहे. पण गव्यांच्या वावरामुळे शेतकºयांत घबराटीचे वातावरण आहे.

सोनवडे परिसरात गव्यांचा धुमाकूळ; :नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वारणावती : शिराळा तालुक्यातील सोनवडे, मणदूर, काळोखेवाडी येथील शिवारात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. सध्या शिवारात धूळवाफेच्या भात पेरणीची धांदल उडाली आहे. पण गव्यांच्या वावरामुळे शेतकºयांत घबराटीचे वातावरण आहे. गव्यांच्या भीतीने भात पेरणी व मशागतीची कामे खोळंबली आहेत. गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी लोकांची मागणी आहे.
सोनवडे येथील काळा डोह परिसरातील उसाच्या शेतात एक गवा लपून बसला होता. गुरुवारी पांडुरंग पाटील, भगवान पाटील, रामचंद्र नाईक शेतात काम करीत असताना अचानक हा गवा उसातून बाहेर आला. शेतात काम करणाºयांनी आरडाओरडा करून तेथून पळ काढला.
तसेच शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजता सोनवडे व मणदूर येथील उसाच्या शिवारात मणदूरच्या शेतकºयांनी गव्यांचा कळप पाहिला. त्यांनी आरडाओरडा करून गव्यांना हुसकावून लावले. ओढ्यात लपलेल्या गव्यांनी हुतात्मा नानकसिंग विद्यालयातील आंब्याच्या बागेत आश्रय घेतला. त्यानंतर विद्यालयातील आंब्याच्या बागेत कामगार व तुकाराम पाटील आंबे काढत असताना अचानक त्यांना ओढाकाठाजवळ पाच-सहा गव्यांचा कळप दिसला अन् त्यांची बोबडीच वळली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर गव्यांचा कळप ओढ्यातून काळोखेवाडीच्या दिशेने डोंगर-दºयातून मिरुखेवाडीकडे निघून गेला.
सध्या शिवारात धूळवाफेच्या भाताची पेरणी व पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. अबाल-वृध्द शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.