सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:48 IST2018-09-09T23:48:27+5:302018-09-09T23:48:31+5:30

सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल
अविनाश कोळी
सांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा थाट पाहण्यासाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविकसुद्धा येत असतात. दरवर्षी पाच दिवसांचा हा उत्सव असतो.
गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच येथील मंदिरात 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमांनंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, खोबरे-पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्यावर्षी लवकर या...' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. पूर्वी या उत्सवाचे नेतृत्व संस्थानच्या हत्तीकडे होते. संस्थानच्या शेवटच्या बबलू हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती सांभाळणे बंद झाले. त्यामुळे उत्सवातील हत्तीची जागा रथाने घेतली. संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली. तरीही हा सोहळा आजही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. सांगलीच्या राजवाड्यापासून पश्चिमेकडील सर्व रस्ते विसर्जनादिवशी गर्दीने भरून जातात. पंचायतनमार्फत दरबार हॉलमध्ये आठ-दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपराही अधिक समृद्ध करण्याचे काम विजयसिंहराजे पटवर्धन यांनीच केले आहे.