सागरेश्वर अभयारण्याला भीषण आग, तीनशे एकर क्षेत्र जळाले; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:50 IST2017-12-29T13:48:54+5:302017-12-29T13:50:54+5:30
सागरेश्वर अभयारण्याला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये अभयारण्यातील ३०० एकर क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील युवक व क्रांती कारखान्याच्या अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

सागरेश्वर अभयारण्याला भीषण आग, तीनशे एकर क्षेत्र जळाले; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्याला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये अभयारण्यातील ३०० एकर क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील युवक व क्रांती कारखान्याच्या अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सागरेश्वर अभयारण्याच्या तुपारी-ताकारी गावाकडील हद्दीमध्ये दुपारी साधारण एकच्या सुमारास कमळभैरव पॉर्इंटवरील कर्मचाऱ्यांस आग लागल्याचे दिसून आले. यानंतर त्याने याबाबत अधिकाऱ्यांना कळवले.
सुरुवातीला किरकोळ वाटणारी आग तुपारी-ताकारीकडील बाजूकडून देवराष्ट्रेकडील बाजूकडे जोरदार वेगाने पसरत गेली. त्यानंतर अधिकारी, वन कर्मचारी, वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर क्रांती कारखान्याच्या अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले.
साधारण सायंकाळी पाचच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अभयारण्याच्या जळालेल्या काही भागातून धुराचे लोट पाहावयास मिळत होते. वन विभागाचे कर्मचारी यावर लक्ष ठेवून होते.
या आगीमध्ये हरणांना पोषक असणारा चारा खाक झाला आहे. याशिवाय दुर्मिळ वनौषधी, सरपटणारे प्राणी मारले गेल्याचा अंदाज आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही हरणाला दुखापत झाल्याचे दिसून आलेले नाही.
ही आग विझविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविताना वन्यजीव विभागाच्या वनरक्षक शिवकन्या नरळे यांच्या हाताला भाजले असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर तात्काळ उपचार केले.