सांगली जिल्ह्यात दसरा, दिवाळीत तब्बल १० लाखांचे अन्नपदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:10 IST2017-10-27T17:03:27+5:302017-10-27T17:10:59+5:30
दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ९ लाख ८८ हजार १० रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. बी. कोडगीरे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात दसरा, दिवाळीत तब्बल १० लाखांचे अन्नपदार्थ जप्त
सांगली , दि. २७ : दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ९ लाख ८८ हजार १० रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. बी. कोडगीरे यांनी दिली.
ग्राहकांना सुरक्षित व चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिलेल्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ४ पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
मिरज तालुक्यातील आरग येथील संगीता एजन्सी येथून भेसळीच्या संशयावरून रिफार्इंड सरकी तेलाचे ३ व खोबरेल तेलाचा १ असे एकूण ४ नमुने घेण्यात आले. उर्वरित १,९३२.४ किलोचा २ लाख ४८ हजार ६३० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
सांगली मार्केट यार्डातील न्यू ऋतुराज ट्रेडर्स येथून भेसळीच्या संशयावरून रिफार्इंड सरकी तेलाचा नमुना घेऊन उर्वरित ३९० किलोचा २७ हजार ६९० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. वाळवा तालुक्यातील बिकानेर स्वीटस्, इस्लामपूर येथून भेसळीच्या संशयावरून शेव या अन्नपदार्थाचा नमुना घेऊन उर्वरित १२८ किलोचा १७ हजार ९२० रुपये किमतीचा साठा जप्त केला.
सांगलीच्या अभयनगर येथील शिवबाबा मिठाई शॉपी व संजय तोरडमल या फिरत्या विक्रेत्याने खवा अस्वच्छ व सामान्य खोलीच्या तापमानात साठवणूक केल्याच्या कारणावरून खव्याचा नमुना घेऊन त्याच्याकडून प्रत्येकी ९८ किलोचा १९ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
डोर्लीत श्रीयश दूध संकलन केंद्रावर कारवाई
तासगाव तालुक्यातील डोर्ली येथील श्रीयश दूध संकलन केंद्र येथून भेसळीच्या संशयावरून गाय दूध २, पांढरे द्रावण (अपमिश्रक), व्हे. पावडर (अपमिश्रक), रिफार्इंड पाम कर्नेल आॅईल (अपमिश्रक), रिफार्इंड सूर्यफूल तेल (अपमिश्रक) असे एकूण ६ नमुने घेऊन उर्वरित १,२४३.८ किलोचा ९८ हजार १९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.