रत्नागिरीतील मिरकरवाडातील गाळ उपसा सुरू, ड्रेझर, बार्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:55 IST2017-11-11T12:48:08+5:302017-11-11T12:55:30+5:30
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडातील गाळ उपसा सुरू, ड्रेझर, बार्ज दाखल
रत्नागिरी ,दि. ११ : शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामासाठी ७१ कोटी ८० लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यातील मिरकरवाडा हे सर्वात मोठे मच्छीमारी बंदर आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस व घटक पक्षांचे सरकार असताना तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खास दुसऱ्या टप्प्यातील कामांना व निधीलाही मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात हे काम रेंगाळलेले होते. आता या कामाला गती मिळाली असून, दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. बंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील बंदराजवळील समुद्रात ६७५ मीटर लांबीच्या ब्रेकवॉटर वॉलला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील ५२५ मीटर वॉलचे काम पूर्ण झाले आहे. या बंदरात ज्या चॅनेलने मच्छीमारी नौका ये-जा करतात, त्या चॅनेलमधील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
६०० क्युबिक मीटर गाळ उपसा क्षमता असलेली बार्ज आणि फ्लोटिंग ड्रेझरही यासाठी बंदरात कार्यरत झाला आहे. त्यामुळे आता जलदगतीने गाळ उपसा होईल, असा विश्वास मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.