जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:37 IST2018-07-13T21:37:17+5:302018-07-13T21:37:40+5:30
राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे .

जुन्नर तालुक्यात धुमाकुळ घालणारा बिबटया जेरबंद
राजुरी : राजुरी गावात एकाच आठवड्यात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याची घटना नुकतीच घडली आहे. राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या बुधवारी (दि. ४) पहाटे पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास उपळीमळ्यामध्ये गणेश नायकवडी यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या अडकला आहे .
राजुरी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घराच्या अंगणात भुईमूग वाळायला टाकणाऱ्या अक्षदा हाडवळे या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, गुंजाळवाडी (खराडीमळा) येथील शिवाजी मनाजी बोरचटे यांच्या गोठ्यात प्रवेश करत दोन शेळ्यांचा फडशा पाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच बिबट्यांनी बोरचटे यांच्या घरासमोर तासभर ठिय्या आंदोलन केले. कोंबरवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात गोविंद कुंजीर हे जखमी झाले होते, तर वंदना किसन यादव या बचावल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी शुक्रवारी रात्री जो बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे, त्या शेतकऱ्याच्या बिबट्याने एकाच आठवड्यात चार शेळ्या ठार केल्या होत्या. त्यामुळे ह्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. तसेच राजुरी येथील अक्षदा हाडवळे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. सुदैवाने या हल्ल्यातून ती मुलगी वाचली आहे. परंतु या ठिकाणी वन विभागाने अद्याप पिंजरा लावलेला नाही. या ठिकाणी दररोज बिबट्या येऊन बसत आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटत असून, वनखाते आमचा जीव गेल्यानंतर या बिबट्याला पकडणार का, असा प्रश्न ज्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता, त्या मुलीचे वडील अशोक हाडवळे यांनी वनखात्याला विचारला आहे. या ठिकाणी येत्या दोन दिवसांनंतर येथे पिंजरा लावण्यात येईल, अशी माहिती वन परिक्षेत्राधिकारी येळे, वनरक्षक जे. बी. सानप, वनरक्षक ए. डी. तांगडवार यांनी दिली.