श्री काळूबाई देवीच्या यात्रेची सांगता
By Admin | Updated: January 14, 2017 03:15 IST2017-01-14T03:15:21+5:302017-01-14T03:15:21+5:30
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत मांढर गडाची काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी गर्दी

श्री काळूबाई देवीच्या यात्रेची सांगता
नेरे : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत मांढर गडाची काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी गर्दी केली आहे़ दोन दिवसांत यात्राकाळात अंदाजे तीन लाख भाविक आल्याचे व मागील वर्षीपेक्षा गर्दी कमी असल्याचे ट्रस्टीचे विश्वस्त सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले.
मांढरदेव (ता़ वाई) येथील काळूबाईदेवीची यात्रा पौष पौर्णिमेला भरते़ पहिल्या दिवशी पहाटे देवस्थान ट्रस्टतर्फे साडेपाच वाजता साताऱ्याचे मुख्य न्यायाधीश देगुडवार, ट्रस्टचे अध्यक्ष डी़ डब्लू. देशपांडे, उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, वाई तहसीलदार अतुल म्हेत्रे तसेच ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुरुवारी शासकीय महापूजा करण्यात आली़
पौष पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी होत आहे़ मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रेच्या दोन दिवसांना जोडूनच भोगी व मंकर संक्रांत आल्याने भाविकांची गर्दी कमी आहे़ मंगळवारपासून भाविकांची गर्दी होईल असा अंदाज असल्याचे व यात्रेची दुसऱ्या दिवसाची सांगता जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भोर प्रशासनाने तीन दिवसांपासून आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याला चोख बंदोबस्त ठेवला आहे़(वार्ताहर)