'Selected Akshardhan' to Meet The Readers Quickly | ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांच्या भेटीला
‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांच्या भेटीला

पुणे - शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. संस्थेची उद्दिष्टे व फलश्रुती, वाङ्मयीन व सामाजिक पर्यावरणविषयक लेख, व्यक्तिवेध, मराठी भाषाविषयक लेख, पुस्तक परीक्षणे, मराठी साहित्य विश्वाचे कवडसे, व्यापक साहित्य विश्वाचे भान अशा सात विभागांत मिळून ७५ निवडक लेख वाचकांना ७०० पृष्ठांच्या या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प हाती घेण्यात
आला.
‘अक्षरधन निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या ग्रंथाचे संपादन साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
रा. भि. जोशी, दत्तो वामन पोतदार, दु. का. संत, पु. य. देशपांडे, ग. त्र्यं. माडखोलकर, श्री. ना. बनहट्टी, श्री. शं. नवरे, म. श्री. दीक्षित, रा. ब. महाजनी, वि. वा. शिरवाडकर, रा. शं. वाळिंबे, प्रतापराव शिंदे, गंगाधर पानतावणे, चंद्रकांत बांदिवडेकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. गं. ना. जोगळेकर, कमल देसाई, प्रा. गं. बा. सरदार, वा. रा. ढवळे, सोपानदेव चौधरी, गो. म. कुलकर्णी, म. पु. केंदूरकर, दादूमिया, रुपसिंह सुंदरसिंह, ग. वा. तगारे, गो. कृ. मोडक, रा. श्री. जोग, शं. गो. तुळपुळे, सरोजिनी बाबर, धर्मानंद कोसंबी, ना. म. भिडे, ना. गो. चापेकर, श्री. रा. टिकेकर, वा. रं. सुंठणकर, म. प. पेठे, ह. श्री. शेणोलीकर, दि. के. बेडेकर, इंदिरा संत, के. नारायण काळे, ना. सी. फडके, कुमुदिनी घारपुरे, भीमराव कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, अशोक निरफराके, डॉ. वसंत स. जोशी, वसंत आबाजी डहाके, सदा कºहाडे, रंगनाथ पठारे, प्रा. रा. ग. जाधव, श्री. के क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, श्रीरंग संगोराम, डॉ. म. द. हातकणंगलेकर, डॉ. प्रभाकर पाटील, द. श्री. बापट, अ. ना. देशपांडे या मान्यवर लेखकांसह अनेक लेखकांचे महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात असणार आहेत.

मुखपत्राचा उपयोग परिपूर्तीसाठी
१ प्रा. जोशी म्हणाले, ‘१९०६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ‘मसाप पत्रिका’ हे मुखपत्र १९१३ पासून मासिकरूपात विविध ज्ञानविस्तारबरोबर प्रकाशित होण्यास प्रारंभ झाला. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या परिषदेने आपल्या मुखपत्राचा उपयोग संस्थेच्या ध्येय उद्दिष्ट यांच्या परिपूर्तीसाठी केलेला आहे. हा ग्रंथ वाचकांसाठी मोलाचा ठेवा ठरेल.’
२ नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका काढण्यामागे परिषदेची ध्येयदृष्टी होती, ती म्हणजे साहित्यिक बंधुभाव निर्माण करणे. पत्रिकेने मराठीच्या विकासप्रक्रियेत सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीपासून मराठी परिभाषानिर्मिती, समीक्षा-संशोधन यांना चालना तसेच वाङ्मय इतिहासलेखनासाठी वार्षिक समालोचनपर अंक काढणे, हे धोरण महत्त्वाचे आहे. पत्रिकेच्या स्वागतशील धोरणामुळे अनेक नवे-जुने लेखक पत्रिकेकडे वळलेले दिसतात. पत्रिकेतील निवडक लेखसंग्रह
म्हणजे ‘अक्षरधन’च ठरणार आहे. त्यातून मराठी साहित्यपरंपरेचे अर्करूप दर्शनही घडेल.

महाराष्ट्र साहित्य पत्रिका (त्रैमासिक) विसाव्या शतकातील संपादक
वि. मो. महाजनी, ना .गो. चापेकर, द. वा. पोतदार, माधवराव पटवर्धन, मो. ज्ञा .शहाणे , रा. श्री. जोग , के. ना. काळे, श्री. म. माटे, य. दि .पेंढरकर, रा . शं. वाळिंबे, वि . भि .कोलते, वा. रा. ढवळे, श्री. के. क्षीरसागर , स. गं. मालशे, भालचंद्र फडके, हे . वि. इनामदार, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, वसंत स. जोशी, शंकर सारडा, वि .स. वाळिंबे, ह. ल. निपुणगे.

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेने काढलेले काही विशेषांक
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर विशेषांक, महर्षी शिंदे विशेषांक , ज्ञानेश्वर विशेषांक (मुद्रण व मांडणीसाठी केंद्रसरकारचा पुरस्कारप्राप्त), पु. ल देशपांडे विशेषांक, ग्रामीण साहित्य विशेषांक, दलित साहित्य विशेषांक, गझल विशेषांक इत्यादी.

ज्या काळात वाडमयीन नियतकालिकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती त्या काळात मसाप पत्रिकेने एका विशिष्ट वाडमयीन भूमिकेतून काम केले. मसापत्रिकेत समकालीन वाडमयीन वातावरण व त्याचे प्रवाह यांचे प्रतिबिंब पडले आहे. विसाव्या शतकात मराठी साहित्य विश्वात स्वत:ची नाममुद्रा उमटवणा-या सर्व मान्यवर आणि महत्वाच्या लेखकांची उपस्थिती हे अंकाचे वैशिष्टय म्हणता येईल. हा ग्रंथ म्हणजे शतकातील साहित्याचा छेद आहे.
- डॉ.अरूणा ढेरे,
संशोधन विभागप्रमुख


Web Title:  'Selected Akshardhan' to Meet The Readers Quickly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.