हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन जप्त; चाकणमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:44 IST2017-12-15T14:41:03+5:302017-12-15T14:44:19+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे.

हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन जप्त; चाकणमध्ये कारवाई
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे. यासोबतच दुसऱ्या कारवाईमध्ये अनधिकृत देशी-विदेशी मद्य आणि बियर विक्री करणाऱ्या हॉटेलवरही छापा टाकून ११० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ९ लाख १९ हजार ३५० असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
हॉटेल मल्हार गार्डन या ढाब्याचा चालक केतन राम जाचक (वय २४, रा. विठाई सदन, जाचक वाडा, दत्त मंदिराजवळ, पिंपरी) याच्यासह चाकण येथील पठारेवस्ती येथून गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या पवनकुमार संजय मैनावत (वय ३४) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जून ओहोळ यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. मोई, चाकण, कुरुळी, निघोजे या परिसरामधील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच बेकायदेशीरपणे देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या या ढाब्यावर कारवाई करण्यात आली.