साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:46 IST2018-01-22T11:43:54+5:302018-01-22T11:46:58+5:30
विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

साहित्यिकांची भूमिका ठाम हवी : योगेश सोमण : विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पुण्यात समारोप
पुणे : ‘साहित्यिकाच्या मनात हट्ट, जिद्द, ठाम भूमिका आणि आत्मविश्वास असायला हवा. साहित्याचा जो दिवा, जी मशाल मनात साहित्य संमेलनामुळे लागलेली आहे, ती तशीच धगधगत राहायला हवी. विद्यार्थी साहित्यिक स्वत:शी जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, तोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही आणि जोपर्यंत कला प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत समाज ती स्वीकारत नाही’, असे मत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आयोजित ‘प्रतिभासंगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेल्या सृजन उत्सवाची रविवारी सांगता झाली. समारोपप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व कलाकार योगेश सोमण, स्वागत समितीचे अध्यक्ष एस. के. जैन, अभाविप राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत साठे, अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष शरद गोस्वामी व राघवेंद्र रिसालदार उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. शरद गोस्वामी यांनी आभार मानले. पुण्यनगरीतील कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरीतील या विद्यार्थी साहित्य संमेलनाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.
मिरासदार यांचे कथाकथन रंगले
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभासंगम’ या विद्यार्थी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे कथाकथन रंगले. त्यांनी जीवनातील विविध अनुभव सादर करून विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. मिरासदार यांनी प्रवासवर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ या प्रवासकथेचे वर्णन करून त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. या वेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ दिले.