आगामी आठवडा मराठवाड्यासाठी दिलासा देणारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:26 PM2017-09-14T22:26:15+5:302017-09-14T22:26:45+5:30
पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या कर्नाटकाची किनारपट्टी या भागात जोरदार वारे असल्याने येत्या आठवड्यातील पहिल्या काही दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, लक्ष्यद्वीप, कर्नाटक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे, दि. 14 - पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या कर्नाटकाची किनारपट्टी या भागात जोरदार वारे असल्याने येत्या आठवड्यातील पहिल्या काही दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, लक्ष्यद्वीप, कर्नाटक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने गुरुवारी पुढील २ आठवड्याचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. ७ ते १३ सप्टेंबर या आठवड्यात देशभरात सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ६ टक्के कमी पाऊस झाला आहे.
१४ ते २० सप्टेंबरदरम्यान मध्य भारत, दक्षिण भारत, पूर्व भारतात सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमाचलीय रांगा, पश्चिम बंगाल, सिक्कीम अंदमान, निकोबार या परिसरात काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, छत्तीसगड, मराठवाडा, पूर्व मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा या भागात पहिल्या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
रात्री का पडतोय पाऊस...
दिवसभर कडक ऊन आणि रात्री धो धो पाऊस असे दृश्य राज्यात सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच इतका जोराचा पाऊस का पडतो. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मान्सून देशभरात स्थिरावल्यानंतर येत्या काही दिवसात राजस्थानमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु होणार आहे. या मधल्या काळात वातावरणात आर्द्रता अधिक प्रमाणात असते पण त्याचवेळी आकाशात ढग फारसे नसतात. त्यामुळे दिवसभर कडक ऊन जाणवते. त्यात आर्द्रता असल्याने घामाचा धारा लागतात. दिवसभर जमीन तापल्याने स्थानिक पातळीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन सायंकाळनंतर किंवा रात्री जोरदार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाच्या अगोदर अशी स्थिती निर्माण होत आहे.
धान्यांचे कोठार पावसाच्या प्रतिक्षेत...
धान्यांचे कोठार समजल्या जाणा-या पंजाब (-१८ टक्के), हरियाना (-२८ टक्के), पश्चिम उत्तरप्रदेश (-३७ टक्के) पूर्व उत्तरप्रदेश (-२७ टक्के), पश्चिम मध्य प्रदेश(-२२ टक्के) व पूर्व मध्य प्रदेश (-२९ टक्के) आणि विदर्भात (- २७ टक्के) या भागात आतापर्यंत पाऊस अत्यंत कमी झाला आहे़ १४ ते २० सप्टेंबर या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाना, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश भागात पाऊस पडण्याची शक्यता नाही़. संपूर्ण देशात पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता असून २१ ते २८ सप्टेंबर दरम्यानही पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
दोन दिवसात विदर्भात जोरदार पाऊस...
येत्या ५ -६ दिवसात राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आर्द्रता वाढल्यामुळे सध्या सायंकाळनंतर पाऊस पडत आहे. येत्या २ दिवसात विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़.
डॉ़. ए. के. श्रीवास्तव, वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग.