निर्माल्य संकलनातून खतनिर्मिती, पुणे परिसरातील २६ ठिकाणी उपक्रमांतून ३५० टन उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:10 IST2018-09-25T01:10:23+5:302018-09-25T01:10:35+5:30
गणेशविसर्जनानंतर नदीकाठांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. विल्हेवाट न लावल्याने नंतर त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते.

निर्माल्य संकलनातून खतनिर्मिती, पुणे परिसरातील २६ ठिकाणी उपक्रमांतून ३५० टन उपलब्धता
भूगाव : गणेशविसर्जनानंतर नदीकाठांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. विल्हेवाट न लावल्याने नंतर त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते. मात्र पुणे परिसरात विसर्जनानंतर गोळा झालेल्या निर्माल्याचे संकलन करुन त्याची खतनिर्मितीसाठी विल्हेवाट लावण्याचे काम काही कंपन्या व सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले. संस्थांनी एकत्रितपणे सुमारे ३५० टन निर्माल्य गोळा केले आहे. निर्माल्याचे कंपोस्ट खत करुन शेतकऱ्यांना देणार आहेत.
स्वच्छ सेवा सहकारी संस्थेने पुणे महानगरपालिकेतील चौदा घाटांवर, गोविज्ञान संशोधन संस्थेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाच, मुळशी तालुक्यातील पाच व शिवणेतील दोन घाटावर असे एकुन २६ घाटांवर निर्माल्य संकलन केले. उपक्रमासाठी कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा, अवंती कदम, संदीप क्षिरसागर, प्रशांत चितळे, अनिल कुलकर्णी, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त उमेश माळी, गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास, आनंद पाठक, प्रतिष पारखी, राजेंद्र लुंकड, प्रदिप पाटील, अशोक वाळके, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे प्रिया कचोरीया यांचे विशेष सहकार्य लाभले.
कमिन्स इंडिया फाऊंडेशनचे सुमारे ५०० अधिकारी व कर्मचारी या २६ घाटांवर पाचव्या व अकराव्या दिवशी विसर्जन घाटावर थांबले होते. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच निर्माल्यदानाचे आवाहन ते करीत होते. कोथरुड परिसरात जनजागृती रॅली काढली होती. प्रकल्पासाठी लागणारा सर्व खर्च कमिन्स इंडिया फाऊंडेशन करीत असल्याचे कमिन्सचे प्रकल्प समन्वयक संदीप क्षिरसागर यांनी सांगितले.
कमिन्स इंडिया फाऊंडेशन, गोविज्ञान संशोधन संस्था, क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जीवन संवर्धन फाउंडेशन, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, आबासाहेब शेळके मित्र मंडळ व भुगाव, भुकुम, पिरंगुट, कासारआंबोली, शिवणे येथील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
परिसरातील शेतकºयांसाठी ‘गोआधारीत शेती’ या विषयावर व खत कसे वापरावे या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना मोफत या गोष्टी वाटण्यात येणार आहे. तसेच सहभागी सोसायट्यांमध्येही खत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास यांनी दिली.
थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचामार्फत गणेशोत्सवाच्या महिनाभर अगोदर भावी पिढीमध्ये पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. परिसरात विविध शाळात मार्गदर्शन शिबिरे, रॅली, स्पर्धांमधुन जनजागृती करण्यात आली. पर्यावरणपूरक गणेशमुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
गतवर्षीपेक्षा संकलनात वाढ
निर्माल्यापासून खत तयार करण्याचे संपूर्ण काम गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत केले जाते.
मागील वर्षी याच घाटांवर सुमारे २२० टन निर्माल्य संकलित करुन ११० टन कंपोस्ट खत तयार करण्यात आले. यंदा वाढ होऊन सुमारे ३५० टन निर्माल्य संकलित करुन यापासून १७५ टन कंपोस्ट खत तयार होईल. खत तयार करण्यासाठी भारतीय गाईचे शेण व गोमुत्र वापरल्याने मागील वर्षी या खताची लॅबमध्ये तपासणी केली असता यात २७ टक्के एवढ्या उच्च प्रमाणात सेंद्रीय कर्ब आढळून आला.
पुण्यातील ४५ सोसायट्यांत जागृती
गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत पुण्यातील ४५ मोठ्या सोसायट्यांमध्येही जागृतीचे काम केले गेले. त्यांना घरगुती व मंडळाच्या गणपतीच्या वेळी जमा झालेल्या निर्माल्यासाठी पिशव्या देण्यात आल्या होत्या. येथून सुमारे २.५ टन निर्माल्य संकलित झाले.
पाच शाळांमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. निर्र्माल्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत तसेच जमा झालेल्या फळांपासून पिकांसाठी संजिवनी अर्क तयार करण्यात येत आहे. नारळांपासून रोपवाटीका केली जाणार आहे.