आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली'

By कमलाकर कांबळे | Published: August 13, 2023 04:05 PM2023-08-13T16:05:54+5:302023-08-13T16:06:05+5:30

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भाजपाचे आयोजन

Under the leadership of MLA Ganesh Naik, 'Tiranga Bike Rally' started in Airoli area. | आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली'

आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली'

googlenewsNext

नवी मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रात नवी मुंबई भाजपच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत युवक- युवतींचा सहभाग लक्षणीय होता. दिघा येथून निघालेल्या या रॅलीचा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.

दिघा येथील तलावाजवळून आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा  चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना आमदार नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये  सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा  घोषणा देत होते. देशभक्तीपर गीतांनी माहोल भारलेला होता. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता.  दिघा येथून सुरू झालेली ही बाईक रॅली ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध भागातून मार्गस्थ होताना ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.  वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली.

आमदार गणेश नाईक,  माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.  दरम्यान, गेल्या वर्षी देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावर्षी या महोत्सवाचा सांगता समारंभ सर्वत्र साजरा केला जात आहे.  प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल अभिमान आहेच. हा अभिमान वृद्धिंगत होऊन  कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले.

Web Title: Under the leadership of MLA Ganesh Naik, 'Tiranga Bike Rally' started in Airoli area.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.