आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:48 IST2018-05-15T02:48:58+5:302018-05-15T02:48:58+5:30
आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता.

आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी अटकेत
नवी मुंबई : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन त्याठिकाणावरून आॅनलाइन सट्टा लावला जात होता. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप तसेच दोन वाहने असा ३९ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातून आयपीएल टी २० च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १ ला मिळाली होती. त्याकरिता मुंबई-पुणे परिसरातील सट्टेबाज एकत्र आल्याचीही खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष १चे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे, वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे, सहायक निरीक्षक नितीन थोरात, नीलेश माने यांचे पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान वाशीतील फोर पॉइंट हॉटेलमध्ये भाड्याच्या खोलीत संशयित तरुण राहत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. यानुसार त्यांनी १२ मे रोजी रात्री १० वाजता १९१८ क्रमांकाच्या खोलीवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी सहा तरुण सट्टा लावण्यासाठी जमल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून खोलीची झडती घेतली असता, ३ लॅपटॉप, २७ मोबाइल, २७ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, व्हाइस रेकॉर्डर आढळून आले. यानुसार त्यांनी वापरलेली दोन वाहने व सट्टा लावण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण ३९ लाख २९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
राकेश अरुण कोंडरे (३०), अभिजित मल्हारी कोळेकर (३३), कृष्णा गणपत सगट (३२), धर्मेश प्रवीण गाला (३५), गणेश संभाजी माने (३४) व किशोर जगदीश रिहाल (३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी दिल्ली डेअर डेविल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू या सामन्यावर आॅनलाइन सट्टा लावला होता. हे सर्व जण पुणे, मुंबईसह नवी मुंबईचे राहणारे आहेत. त्यांना १७ मेपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.