मुख्यमंत्र्यांना खर्डी अन्यायग्रस्त शेतकरी दाखवणार काळे झेंडे
By Admin | Updated: January 21, 2016 02:43 IST2016-01-21T02:43:50+5:302016-01-21T02:43:50+5:30
महाड तालुक्यातील खर्डी पाणलोट आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी दाखल होवून, कारवाई होण्याकरिता धरणे व उपोषण केले

मुख्यमंत्र्यांना खर्डी अन्यायग्रस्त शेतकरी दाखवणार काळे झेंडे
अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी पाणलोट आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी दाखल होवून, कारवाई होण्याकरिता धरणे व उपोषण केले, तरी देखील रायगड जिल्हा प्रशासन, रायगड जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेने गेल्या दीड वर्षात कोणतीही कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ रायगड महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ््यास येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय खर्डी(महाड)च्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या निषेध आंदोलनाचे निवेदन रायगड जिल्हा प्रशासन व रायगड जिल्हा पोलीस प्रशासनास देखील पाठविण्यात आल्याचे पीडित ग्रामस्थ संदेश उदय महाडिक यांनी सांगितले.
खर्डी पाणलोट विकास योजनेत प्रचंड प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबंधित शासकीय अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, महाड उपविभागीय कृषी अधिकारी, महाड उपविभागीय अधिकारी, महाड तहसीलदार, महाड गटविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड, यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. प्रशासन केवळ आश्वासन देते. मात्र कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने २५ आॅगस्ट २०१५ पासून आम्ही महाड तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी ‘संबंधितांवर कार्यवाही करु’ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.खर्डी पाणलोट भ्रष्टाचारविरोधात ६ जुलै २०१५ रोजी जिल्हा लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिला होता. त्यावेळी एक महिन्यात कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आठ महिने होऊनही कार्यवाही शून्यच आहे असे निवेदनात नमूद आहे.