पंतप्रधान प्राणप्रतिष्ठापना करतील, मग मी तिथे टाळ्या वाजवू का? पुरीच्या शंकराचार्यांनी घेतले अयोध्येला न जाण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 12:39 PM2024-01-04T12:39:46+5:302024-01-04T12:40:21+5:30
Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता आहे.
अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याला भव्य दिव्य बनवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्येतील प्रशासन जय्यत तयारी करत आहे. मंदिराचा तळमजला बांधून पूर्ण झाल आहे. तिथे सध्या सजावटीचं काम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता आहे.
मात्र या गोष्टीला ओदिशामधील जगन्नाथपुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. रतलाम येथे संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार नाही. तिथे मोदी लोकार्पण करतील. मूर्तीला स्पर्श करतील. मग मी तिथे उभा राहून टाळ्या वाजवून केवळ जयजयकार करू का? माझ्या पदाची एक मर्यादा आहे. राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही शास्रांनुसार झाली पाहिजे. अशा सोहळ्याला मी का जाऊ.
दरम्यान, राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टकडून मिळालेल्या निमंत्रणाबाबत शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले की, मला जे निमंत्रण मिळालं आहे. त्यावर तुम्ही आणि तुमच्यासोबत केवळ एक व्यक्ती सोहळ्याला येऊ शकते, असं लिहिलेलं आहे. त्याव्यतिरिक्त आमच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे मी या सोहळ्याला जाणार नाही. राम मंदिरावरून ज्या प्रकारचं राजकारण होत आहे, ते होता कामा नये होते. सध्या राजकारणामध्ये काहीही चांगलं घडत नाही आहे, असं ते म्हणाले. तसेच धार्मिक स्थळांवर बांधण्यात येत असलेल्या कॉरिडोरवरही त्यांनी टीका केली.