म्हणून व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश हिने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 20:59 IST2018-02-19T20:50:43+5:302018-02-19T20:59:09+5:30
काही सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या प्रिया प्रकाश वारियर हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

म्हणून व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश हिने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
नवी दिल्ली - काही सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या प्रिया प्रकाश वारियर हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या चित्रपटावर होत असलेल्या कायदेशीर कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी तिने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. प्रियाच्या वकिलांनी याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची विनंती न्यायालयास केली आहे. दरम्यान याप्रकरणी मंगळवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रिया प्रकाश आणि ओरू अडार लव्ह या मल्याळम चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. गाण्यातील शब्द धार्मिक भावना दुखावणारे असल्याचं म्हणत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तशाच प्रकारची तक्रार महाराष्ट्रातही दाखल झाली आहे.
प्रिया प्रकाश स्टारर 'ओरू अडार लव' हा सिनेमा 3 मार्च रोजी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमातील 'मानिका मलयारा पूवी' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच गाण्यातील एक लहान क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामध्ये प्रिया तिच्या भुवया उडवताना दिसते आहे. तिची ही अदाकारी सोशल मीडियावर तरूणांच्या चांगल्याच पसंतीस उतरली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.