रणजित रंजन संसदेत आल्या ‘बाईक’वरून
By Admin | Updated: March 9, 2016 05:02 IST2016-03-09T05:02:05+5:302016-03-09T05:02:05+5:30
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन मंगळवारी आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या

रणजित रंजन संसदेत आल्या ‘बाईक’वरून
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन मंगळवारी आपल्या हार्ले डेव्हिडसन बाईकवरून संसदेच्या आवारात आल्या, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांचीही काही काळ धावपळच उडाली. संसदेत बाईक घेऊन यायची परवानगी नसताना, निळ्या रंगाचा सूट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल असलेल्या ४२ वर्षीय रणजित रंजन बाईकवरून आल्या, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओळखलेच नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्याने त्या बाईक थेट आवाराच्या आत घेऊन गेल्या.
आपण बाईकच काय, अनेकदा सायकलही चालवतो, असे रणजित रंजन यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. खा. रंजन या दोन मुलांची आई आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)