मुस्लिम महिला करणार योगा व सूर्यनमस्कार
By Admin | Updated: March 31, 2017 08:12 IST2017-03-31T07:58:07+5:302017-03-31T08:12:24+5:30
सूर्य नमस्काराला भलेही काही मुस्लिम विरोध करत असले, तरीही अहमदाबादमधील काही मुस्लिम महिला आता सूर्यनमस्कारासहीत योगा करणार आहेत.

मुस्लिम महिला करणार योगा व सूर्यनमस्कार
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 31 - सूर्य नमस्काराला भलेही काही मुस्लिम विरोध करत असले, तरीही अहमदाबादमधील काही मुस्लिम महिला आता सूर्यनमस्कारासहीत योगा करणार आहेत. शहरातील काही महिला योगा ट्रेनिंगशी जोडल्या गेल्या आहेत.
योगा क्लासेसमध्ये सूर्य नमस्कार घालणं चुकीचं आहे असं त्यांना वाटत नाही. एका एनजीओनं याठिकाणी योगा क्लासेस सुरू केले आहेत. या क्लासमध्ये जवळपास 32 महिलांनी नोंदणी केली आहे. खानपूर परिसरात एका खासगी इमारतीत हा योगा क्लास पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेसच्या नगरसेविका अजरा कादरी यांनीही या क्लासमध्ये नाव नोंदवलं आहे. "योगा भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहे. याचा धर्माशी काहीही एक संबंध नाही. सूर्य नमस्कार घालणं म्हणजे पूजा करण्यासारखं आहे, हे मी मानत नाही", असं मत यावेळी अजरा यांनी मांडलं.
दरम्यान, योगा मुस्लिम महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृत करण्याचं काम करेल, असे एनजीओसोबत काम करणा-या फरहत जहान सय्यद म्हणाल्या आहेत. त्यांनी असंही सांगितले की, सर्वात महत्त्वपूर्ण बाब ही आहे की मुस्लिम महिलांनी सामाजिक बंधनं झुगारून सर्वांसमोर यावं, हा आमचा उद्देश आहे.
सूर्य नमस्कार घालणं इस्लामविरोधी असल्याचं सांगत काही मुस्लिम धर्मगुरूंकडून योगा आणि विशेष करुन सूर्य नमस्काराला कठोर विरोध करण्यात आला. योगा एक विज्ञान आहे आणि त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, असं परखड मतही सय्यद यांनी मांडलं.