भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:36 AM2023-08-14T08:36:16+5:302023-08-14T08:36:31+5:30
आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे.
डेहराडून: उत्तरकाशी जिल्ह्यातील चोरगड नदीवरील बेली पूल अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. हा पूल आयटीबीपीसाठी महत्वाचा असल्य़ाने खळबळ उडाली आहे.
गंगोत्री नॅशनल पार्क (GNP) च्या नेलॉन्ग व्हॅली परिसरातील हा पूल भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांसाठी खूप महत्वाचा होता. उत्तरकाशीला हिमाचल प्रदेशमार्गे भारत-चीन सीमेला जोडणारा हा पूल आहे. याचा वापर भारत-चीन सीमेवर गस्तीसाठी केला जात होता. तसेच वनरक्षक आणि स्थानिक मेंढपाळही या पुलाचा वापर करतात.
आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे. चोरगड नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल काही दिवसांपूर्वी कोसळला होता. पुलाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सोबतच प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे जीएनपीचे उपसंचालक आर.एन.पांडे यांनी सांगितले.
बेली ब्रिज कोसळल्यामुळे चीन सीमेवर लष्कर आणि आयटीबीपीला जाण्यास खूप अडचण येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन स्तरावरून सार्वजनिक बांधकाम विभाग भटवाडी यांना पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मुल्यांकन करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पूल जलदगतीने तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.