केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं सरन्यायाधींशांच्या आदेशाचं कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 11:23 AM2023-05-01T11:23:24+5:302023-05-01T11:23:51+5:30
Kiren Rijiju: केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अंतरिम आदेशाबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचं कौतुक केलं आहे.
केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका अंतरिम आदेशाबद्दल सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचं कौतुक केलं आहे. कोर्टाने रायटर्स क्रॅम्प नावाच्या समस्येशी झुंजत असलेल्या न्यायिक सेवा परीक्षार्थिला उत्तराखंड सिव्हिल न्यायाधीश भरतीची प्रवेश परीक्षा लिहिण्यासाठी एका व्यक्तीची मदत घेण्याची परवानगी दिली आहे होती.
रायटर्स क्रॅम्प नावाच्या समस्येमध्ये कुठल्याही व्यक्तीला लिहिण्यामध्ये अडथळे येतात. अशा परिस्थितीत या समस्येमुळे पीडित असलेल्या धनंजय कुमार नावाच्या परीक्षार्थीला लेखी परीक्षा देण्यासाठी एका व्यक्तीची मदत देण्याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. धनंजय याच्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अंतरिम आदेश दिला होता.
दरम्यान, कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी या आदेशाचं कौतुक केलं आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये रिजिजू म्हणाले की, माननीय सरन्यायाधीश डॉ. डी.वाय. चंद्रचूड यांनी हे एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. उत्तराखंडमध्ये न्यायिक सेवा परीक्षा देण्यासाठी इच्छुक दिव्यांग परीक्षार्थीला हा दिलासा देणारा निर्णय आहे. रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या परीक्षार्थीच्या वकिलाने ट्विटरवर ट्विट केलेला स्क्रिनशॉट शेअर करून लिहिले की, पात्र व्यक्तीला वेळेवर न्याय मिळणं खूप दिलासादायक आहे.
धनंजय कुमार याने त्याच्या याचिकेमध्ये सांगितले होते की, उत्तराखंड लोकसेवा आयोगाने निर्धारित परीक्षेच्या काही दिवस आधी २० एप्रिल रोजी त्याचा अर्ज फेटाळला आहे. धनंजय कुमार रायटर्स क्रॅम्प नावाच्या समस्येने पीडित आहे. त्यांनी आपल्या विनंती अर्जाच्या समर्थनामध्ये एम्सकडून दिलेलं मेडिकल सर्टिफिकेटही सादर केलं होतं.