डोकलामप्रश्नी भारताने चीनसमोर गुडघे टेकले- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:45 AM2018-08-03T01:45:53+5:302018-08-03T01:46:04+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलामवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका करताना, स्वराज यांनी चीनपुढे गुडघे टेकले व शूर जवानांचा विश्वासघात केला, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलामवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका करताना, स्वराज यांनी चीनपुढे गुडघे टेकले व शूर जवानांचा विश्वासघात केला, असे म्हटले आहे.
स्वराज यांनी काल, बुधवारी लोकसभेत डोकलाम वाद भारताने राजकीय परिपक्वतेने मिटवला, त्यात एक इंच जमीनही गमावली नाही आणि चिनी सैन्य तिथे येण्यापूर्वी जी स्थिती होती, ती पुन्हा निर्माण केली, असा दावा केला होता. मात्र चीन तिथे छुप्या पद्धतीने पुन्हा सक्रिय होत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी घेतला.
वुहानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली होती. त्या चर्चेचे विषय का ठरविले नाहीत, असा सवाल तृणमूलचे सोगत रॉय यांनी काल लोकसभेत केला, तेव्हा, सर्व विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा व्हावी, असा तिचा हेतू असल्याने विषय आधी ठरविण्यात आले नव्हते, असे स्वराज म्हणाल्या होत्या. त्या बैठकीत डोकलामचा विषय न काढल्याबद्दल राहुल गांधी व अन्य विरोधी नेत्यांनी याआधीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.
राहुल यांचे अज्ञान?
राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना परराष्ट्रविषयक प्रश्नांची माहिती नाही, त्याबाबत ते अज्ञानी आहेत, असे दिसते. त्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी माहिती द्यायला हवी होती.