लसीकरण वाढल्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:50 PM2021-09-10T17:50:17+5:302021-09-10T17:50:48+5:30
विविध कंपन्यांचे संकेत : अमेरिकेतही कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याच्या सूचना
नवी दिल्ली : देशातील लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे भारतातील आयटी कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ संपविण्याच्या विचारात आहेत. लवकरात लवकर कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेण्याच्या सूचना कंपन्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याचे नियोजन सुरू आहे. अमेरिकेतही सर्वच क्षेत्रातील कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कार्यालयात बोलाविण्याची तयारी केली असून, तशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
आयटी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सप्टेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याची तयारी सुरू आहे. सुरुवातीला ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्याचे नियोजन करीत असल्याचे टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. तर गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्यादेखील लसीचे दाेन डोस झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
अमेरिकेत कामावर बोलाविण्याची घाई
अमेरिकेत सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यास सुरुवात केली आहे. बँका तसेच वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी संपूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून कामावर बोलाविले आहे, तर काही कंपन्यांनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले आहे.